स्वादीस्ट चिकन स्टफ कबाब: चिकन स्टफ कबाब हे फार लोकप्रिय डीश आहे व हे बनवण्यासाठी खूप सोपे आहेत. तसेच झटपट होणारे आहेत. आपल्या घरी पार्टी असली तर किंवा इतर वेळी सुद्धा बनवायला सोपे आहेत.
चिकनचे पदार्थ सर्व जण अगदी आवडीने खातात. अश्या प्रकारचे कबाब बनवतांना सर्व प्रथम चिकनचे सारण बनवून घ्यायचे मग बटाट्याचे उंडे तयार करून त्यामध्ये ते भरायचे व शालो फ्राय करायचे.
चिकन कबाब ही स्टारटर डीश आहे किंवा ते नुसते खायला सुद्धा मस्त लागतात . लहान मुले तसेच मोठे सुद्धा आवडीने खातात. पुदिना चटणी किंवा टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ८ बनतात
साहित्य: आवरणासाठी:
४ मध्यम आकाराचे बटाटे (उकडून,सोलून,किसून)
२ ब्रेड स्लाईस (ब्रेड क्रम्बस)
२ हिरव्या मिरच्या
१/२” आले तुकडा
२ टे स्पून कोथंबीर (चिरून)
मीठ चवीने
२ टोस्ट (मिक्सरमध्ये बारीक करून)
सारणाकरीता (stuffing):
४ चिकन पीसेस (शिजवलेले)
१ टे स्पून तेल
१ मध्यम आकाराचा कांदा (चिरून)
१ टे स्पून आले-लसून-हिरवी मिरची पेस्ट
१/४ टी स्पून हळद
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/२ टी स्पून गरम मसाला
१ टी स्पून लिंबूरस
२ टे स्पून कोथंबीर (चिरून)
२ टे स्पून पुदिना (चिरून)
मीठ चवीने, तेल शालोफ्राय करण्यासाठी
कृती: सारणा करीता: सर्व प्रथम चिकनचे पीसेस धुवून शिजवून घ्या मग त्याचे बारीक तुकडे करून घ्या. (जर चिकन खिमा असेलतर तो वापरला तरी चालेल.) कांदा बारीक चिरून घ्या. आले-लसून-हिरवी मिरची पेस्ट बनवून घ्या.
एका कढईमधे तेल गरम करून मग त्यामध्ये कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या. मग त्यामध्ये आले लसून हिरवी मिरची पेस्ट घालून परतून हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, लिंबूरस, मीठ घालून मिक्स करून घ्या. मग चिकनचे पीसेस घालून थोडे परतून व दोन टे स्पून पाणी घालून कोथंबीर, पुदिना घाला चांगली वाफ आली की विस्तव बंद करा.
आवरणासाठी: बटाटे उकडून, सोलून, किसून घ्या. मिक्सरमध्ये ब्रेडचे स्लाईस, हिरवी मिरची, आले घालून थोडेसे ग्राईड करून बटाट्यामध्ये घालून मीठ व कोथंबीर घालून चांगले मळून घ्या. मळलेल्या पीठाचे छोटे छोटे गोळे बनवून त्यामध्ये एक चमचा सारण भरून गोळा चांगला बंद करून घ्या. मग टोस्टची बारीक पूड करून बटाट्याचे कबाब टोस्टमध्ये घोळून घ्या.
फ़्राईग पॅनमध्ये थोडेसे तेल गरम करून त्यामध्ये कबाब शालोफ्राय करून घ्या.
गरम गरम चिकन कबाब टोमाटो सॉस बरोबर किंवा पुदिना चटणीबरोबर सर्व्ह करा.