होम मेड चीज स्वीट कॉर्न पास्ता: पास्ता म्हंटले की बच्चेकंपनी खूप खुश होते. आपण पास्ता मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीला किंवा नाश्त्याला किंवा मुलांना डब्यात द्यायला सुद्धा बनवू शकतो. ही एक छान टेबलवर आकर्षक दिसणारी व झटपट होणारी डीश आहे. पास्ता ही एक इटालियन डिश आहे ती मी वेगळ्या प्रकारे बनवली आहे. ह्यामध्ये सॉस वापरला नाही.
पास्ता बनवतांना स्वीट कॉर्न दाणे, शिमला मिर्च, लाल पिवळी किंवा हिरवी वापरली की पास्ता अजून आकर्षक दिसतो. तसेच पास्ता बनवतांना चीज, लिंबूरस, वापरले आहे त्यामुळे ते अजून टेस्टी लागते. मुलांना अश्या प्रकारचा पास्ता नक्की आवडेल.
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
२५० ग्राम पास्ता (शिजवलेला)
१ कप स्वीट कॉर्न दाणे (उकडून)
१ मोठा कांदा (पाकळी सारखे चौकोनी तुकडे करून)
१ मोठी शिमला मिर्च (चौकोनी तुकडे करून)
२ हिरव्या मिरच्या (चिरून)
२ चीज क्यूब (किसून)
१/४ कप कोथंबीर (चिरून)
१ छोटे लिंबूरस
१ टी स्पून मिरे पावडर
मीठ चवीने
१ टे स्पून तेल
२ टे स्पून बटर
कृती: एका मोठ्या आकाराच्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवा मग त्यात मीठ व एक टी स्पून तेल घालून उकळी आली की पास्ता घाला व ७-८ मिनिट शिजवून घ्या मग चाळणीवर ओतून जास्तीचे पाणी काढून पास्त्यावर थोडे थंड पाणी घालून चाळणी तशीच बाजूला ठेवा. स्वीट कॉर्नचे दाणे उकडून घ्या. कांदा, शिमला मिरची, हिरवी मिरची, कोथंबीर चिरून घ्या. चीज किसून घ्या.
एका मोठ्या आकाराच्या कढईमध्ये तेल व बटर गरम करून कांदा घालून गुलाबी रंगावर पारदर्शक होई परंत परतून घ्या मग त्यामध्ये शिमला मिर्च, हिरवी मिरची घालून थोडी परतून कॉर्नचे दाणे, मीठ घालून मिक्स करून शिजवलेला पास्ता घालून मिक्स करा. मग त्यामध्ये लिंबूरस, कोथंबीर, मिरे पावडर घालून मिक्स करून एक चांगली वाफ येवू द्या मग त्यामध्ये किसलेले चीज घालून मिक्स करून थोडे गरम करून सर्व्ह करा.
गरम गरम टेस्टी सोपा चीज कॉर्न पास्ता सर्व्ह करा सर्व्ह करतांना वरतून कोथंबीर व चीज घालून सर्व्ह करा.