महाराष्ट्रीयन स्टाईल लोकप्रिय शाही चिवडा: चिवडा हा पदार्थ असा आहे की लहान मुलांना व मोठ्यांना सुद्धा आवडतो.
दिवाळी आली की आपण लाडू, चकली, करंजी, शेव बनवतो त्या बरोबर आपल्याला चिवडा तर हवाच. चिवड्यामुळे आपल्या तोंडाला छान चव येते. आपण चिवडा वेगवेगळ्या प्रकारे बनवता येतो. आपण पातळ पोहे, मक्याचे पोहे, भाजके पोहे ह्याचा चिवडा नेहमी बनवतो.
शाही चिवडा बनवून बघा, अश्या प्रकारचा चिवडा बनवायला सोपा व झटपट होणारा आहे ह्यामध्ये दगडी पोहे, शेंगदाणे, खोबरे, काजू, बटाट्याच्या सळ्या तळून घेतल्या आहेत. व वरतून लाल मिरची पावडर, हळद, मीठ, पिठीसाखर घातली आहे त्यामुळे हा चिवडा मसालेदार होत नाही. पण ड्रायफ्रुट जास्त आहेत त्यामुळे ह्या चिवड्याला शाही चिवडा सुद्धा म्हणता येईल.
शाही दगडी पोह्याचा चिवडा आपण दुपारी चहा बरोबर किंवा नाश्त्याला सर्व्ह करू शकतो. तसेच मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला सुद्धा मस्त आहे.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ५०० ग्राम
साहित्य:
२५० ग्राम ग्राम जाडे दगडी पोहे
१ कप बटाट्याच्या सळ्या,(तळलेल्या)
१ कप शेंगदाणे
१ कप सुके खोबरे (पातळ काप करून)
५० ग्राम किसमिस
५० ग्राम काजू तुकडे
५० ग्राम बदाम
१/२ टी स्पून हळद
१ टी स्पून लाल मिरची पावडर
मीठ व पिठीसाखर चवीन
वनस्पती तूप पोहे तळण्यासाठी
कृती: कढईमधे तूप गरम करून त्यामध्ये प्रथम शेंगदाणे तळून घ्या व बाजूला ठेवा. मग खोबरे काप तळून घ्या. काजू, बदाम व किसमिस तळून घ्या. तळलेले जीनस टिशू पेपरवर ठेवा म्हणजे जास्तीचे तूप निघून जाईल.
मग दगडी पोहे तळून घ्या व टिशू पेपरवर ठेवा. सर्व तळलेले जीनस एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये काढून घ्या मग वरतून मीठ पिठीसाखर, हळद, लाल मिरची पावडर व बटाट्याच्या सळ्या घालून चांगले हलक्या हातानी मिक्स करून घ्या. हा चिवडा थोडा गोडच लागतो.
शाही चिवडा थंड झाल्यावर प्लास्टिकच्या पिशवीत भरून घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.
The English language recipe of this Chivda can be seen here – Maharashtrian Style Shahi Chivda