गणपती बाप्पांच्या खिरापत प्रसादासाठी महाराष्ट्रीयन पंचखाद्य व मोदक रेसिपी
भाद्रपद महिना चालू झाला की गणपती उत्सवाची धामधूम चालू होते. महाराष्ट्रात तर गणपती उत्सवाचे खूप महत्व आहे व हा उत्सव सगळेजण खूप आनंदाने व जोमाने साजरा करतात.
गणपती उत्सव चालू झालाकी रोज सकाळी व संध्याकाळी आरती झाली की छान गोड नेवेद्य वाटतात. गणपती बाप्पांना तर मोदक खूप आवडतात. गणपती आरती झाली की पंचखाद्यचा नेवेद्य खिरापत म्हणून पाहिजेच.
पंचखाद्य ही खिरापत बनवायला अगदी सोपी आहे व झटपट होणारी आहे. पंचखाद्यचे सारण बनवून आपण त्याचे खूप छान खमंग मोदक किंवा करंजी सुद्धा बनवता येते.
पंचखाद्य ही खिरापत बनवतांना सुके खोबरे, खसखस, किसमिस, खारीक, पत्री खडीसाखर, पिठीसाखर, गव्हाचे पीठ, तूप व वेलचीपूड वापरतात. सारण बनवून झालेकी मैदा किंवा रवा भिजवून त्याचे मोदक बनवता येतात.
बनवण्यसाठी वेळ: ४५ मिनिट
पंचखाद्य खिरापत वाढणी: २०० ग्राम
वाढणी: ११ मोदक
पंचखाद्य साहित्य:
१ मध्यम आकाराची वाटी सुके खोबरे (किसून)
१/२ टे स्पून खसखस (भाजून कुटून)
१ टे स्पून किसमिस
१/४ कप खारीक कुटून
१ टे स्पून खडीसाखर
१/४ कप पिठीसाखर
१ मध्यम आकाराची वाटी गव्हाचे पीठ
१ टे स्पून साजूक तूप
१ टी स्पून वेलचीपूड
पंचखाद्य मोदक :
साहित्य:
१/२ कप मैदा
१/२ कप रवा
२ टे स्पून तेल (कडकडीत मोहन)
मीठ चवीने
तळण्यासाठी तेल अथवा तूप
कृती: पंचखाद्य खिरापत बनवण्यासाठी: प्रथम खोबरे किसून वरचा काळा भाग काढून बाजूला ठेवा व पांढरा किसलेला भाग घ्या. मग किसलेले खोबरे मंद विस्तवावर भाजून चुरून ठेवा.
एका कढईमधे साजूक तूप गरम करून गव्हाचे पीठ गुलाबी रंगावर भाजून घ्या. एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये भाजलेले सुके खोबरे, खसखस, किसमिस, खारीक व खडीसाखर घालून मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये भाजलेले गव्हाचे पीठ, वेलचीपूड, पिठीसाखर घालून परत चांगले मिक्स करून घ्या. आता आपली खमंग पंचखाद्य खिरापत तयार झाली.
पंचखाद्य मोदक बनवण्यासाठी: एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये रवा, मैदा व मीठ घालून मिक्स करून त्यामध्ये गरम कडकडीत तेलाचे मोहन घालून चांगले मिक्स करून दुध अथवा पाणी वापरून चांगले घट्ट पीठ मळून घेऊन ३० मिनिट झाकून बाजूला ठेवा.
मग मळलेल्या पीठाचे एक सारखे ११ गोळे बनवून घ्या. एक गोळा पुरी सारखा लाटून त्याला हातानी मुखऱ्या पाडून त्यामध्ये एक चमचा पंचखाद्यचे सारण भरून मोदक चांगला बंद करावा अश्या प्रकारे सर्व मोदक बनवून घ्या.
एका कढईमधे तेल अथवा तूप गरम करून मंद विस्तवावर गुलाबी रंगावर मोदक तळून घ्या.
आपले पंचखाद्य मोदक गणपती बाप्पाच्या नेवेद्यसाठी तयार आहेत.
The Marathi langauge video of this recipe can be seen on our YouTube Channel – गणपती बाप्पांच्या खिरापत प्रसादासाठी महाराष्ट्रीयन पंचखाद्य व मोदक