सोपा झटपट चवीस्ट नायलॉन पोहे चिवडा: नायलॉन पोह चिवडा बनवायला सोपा व झटपट होणारा आहे. आपण अश्या प्रकारचा चिवडा दिवाळी फराळा मध्ये बनवू शकतो किंवा इतर दिवशी सुद्धा बनवू शकतो. दिवाळी आली की आपण लाडू, करंजी, चकली, शेव बनवतो त्यामध्ये चिवडा तर हा हवाच त्याशिवाय आपला फराळ पूर्ण कसा होणार. चिवडा बनवतांना आपण वेगवेगळ्याप्रकारे बनवू शकतो.
महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवलेला हा चिवडा चवीस्ट लागतो. चिवड्यामूळे आपल्या तोंडाला छान चव येते. दिवाळी फराळाचे ताट समोर आलेकी आपण प्रथम चिवडा टेस्ट करतो. कारण तो चमचमीत असतो.
नायलॉन पोहे चिवडा बनवताना पोहे, शेंगदाणे, सुके खोबरे, डाळ्या, हिरव्या मिरच्या, कडीपत्ता वापरला आहे. अश्या प्रकारचा चिवडा बनवतांना तेल अगदी कमी लागते व छान कुरकुरीत होतो व हा चिवडा पचायला सुद्धा हलका आहे.
साहित्य :
२५० ग्राम नायलॉन पोहे
३/४ कप शेंगदाणे
३/४ कप सुके खोबरे (काप)
१/२ कप पंढरपुरी डाळ
१/४ कप काजू तुकडे
१/४ टी स्पून सायट्रिक असिड
३ टे स्पून पिठीसाखर
मीठ चवीने
फोडणी करीता:
२ टे स्पून तेल
२ टी स्पून मोहरी
२ टी स्पून जिरे
१/२ टी स्पून हळद
४-५ हिरव्या मिरच्या (चिरून)
१५ कडीपत्ता पाने
कृती: सर्व प्रथम नायलॉन पोहेला चांगले उन द्या. सुके खोबरे काप करून घ्या. हिरवी मिरचीचे चिरून घ्या. साखर व सायट्रिक असिड मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, कडीपत्ता पाने, हिरव्या मिरच्या घालून शेंगदाणे व सुके खोबरे काप, काजू घालून गुलाबी रंगावर परतून घ्या. मग त्यामध्ये हळद, पंढरपुरी डाळ व पोहे घालून मिक्स करून घेवून त्यामध्ये मीठ व पिठीसाखर घालून मिक्स करून मंद विस्तवावर चिवडा छान कुरकुरीत परतून घ्या.
नायलॉन पोहे चिवडा थंड झाल्यावर प्लास्टिकच्या पिशवीत भरून घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.