सोपा झटपट ऑईल फ्री रोस्टेड चिवडा: अश्या प्रकारचा चिवडा बनवतांना तेल आजीबात वापरले नाही, ह्या मध्ये मिठाचा वापर करून साहित्य भट्टी सारखे भाजून घेऊन चिवडा बनवला आहे.
ऑईल फ्री रोस्टेड चिवडा बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे. घरच्या घरी आपल्याला मस्त अश्या प्रकारचा चिवडा बनवता येतो. आजकालच्या धकाधकीच्या धकीच्या जीवनात आपण खूप हेल्थकेअर घेतो म्हणजेच जास्त तेलकट तुपकट खाणे टाळतो किंवा काही आपल्या तब्येतीच्या तक्रारी असतात त्यामुळे आपल्याला तेलकट काही खायचे नसते तेव्हा अश्या प्रकारचा चिवडा बनवावा.
ऑईल फ्री रोस्टेड चिवडा आपण नाश्त्याला दुपारी चहा बरोबर सर्व्ह करू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी:४०० ग्राम बनतो
साहित्य :
२५० ग्राम जाड पोहे (कांदा पोहेचे पोहे)
१ कप शेंगदाणे
२ कप मखाने
१/४ कप काजू तुकडे
१५ कडीपत्ता पाने
१ कप मीठ (भाजण्यासाठी)
१ चाळणी (गव्हाचे पीठ चालतो ती)
चाट मसाला किंवा लाल मिरची पावडर चवीने
कृती:
प्रथम एका जाड बुडाच्या कढई गरम करून त्यामध्ये मीठ घालून गरम करून घ्या. मग त्यामध्ये थोडे पोहे घालून गुलाबी रंगावर मंद विस्तवावर भाजून घ्या. पोह्याचा रंग बदलला की ते चाळणीमध्ये काढून घ्या मीठ चाळले जाईल व पोहे चाळणीमध्ये राहतील ते एका मोठ्या बाउल मध्ये ठेवा. मग परत तेच मीठ कढईमधे घालून बाकीचे सर्व पोहे भाजून घेऊन बाऊलमध्ये ठेवा.
मग शेंगदाणे भाजून घ्या. शेंगदाणे भाजून थंड झाल्यावर त्याची साले काढून टाका. मग मखाने भाजून घ्या. मखाने भाजून झाल्यावर काजू भाजून घ्या. शेवटी राहिलेले मीठ बाजूला ठेवून ते आपण परत पुढच्या वेळी भाजण्यासाठी वापरू शकतो. मीठ काढल्यावर कडीपत्ता भाजून घ्या.
एका मोठ्या आकाराच्या बाऊलमध्ये भाजलेले पोहे, शेंगदाणे, मखाने, काजू घालून मिक्स करून त्यावर लाल मिरची पावडर किंवा चाट मसाला घालून चांगले मिक्स करून घ्या. मग हवा बंद डब्यात भरून ठेवा.
ऑईल फ्री रोस्टेड चिवडा चहा बरोबर किंवा नुसता खायला सुद्धा टेस्टी लागतो.