पंजाबी पद्धतीने तव्यावर नान किंवा कुलचा घरी बनवा:
पंजाबी स्टाईल बटर नान किंवा कुलचा अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपण घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो. त्यासाठी ओव्हन किंवा माईक्रोवेव्ह पाहिजे असे नाही. आपल्याला घरी ग्यास वर तवा ठेवून सुधा बनवता येतो.
आपण कुलचे बनवताना त्यामध्ये बटाट्याचे किंवा पनीरचे सारण भरून बनवू शकतो. पण आता मी हे प्लेन कुलचे बनवले आहेत. अश्या प्रकारचे बटर कुलचे किंवा नान ग्रेव्ही बरोबर किंवा चिकन मटन रस्सा किंवा छोले ह्या बरोबर सर्व्ह करू शकतो.
पंजाबी कुलचे किंवा नान बनवतांना मैदा, दही, ड्राय इस्ट, मीठ, तेल व साखर वापरली आहे.
पंजाबी कुलचे किंवा नान कसे बनवायचे त्याचे साहित्य व कृती आमच्या साईटवर येथे पहा:
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी (८ बनतात)
साहित्य:
३ कप मैदा
२ टी स्पून तेल
२ टी स्पून दही
मीठ चवीने
१/२ कप पाणी (कोमट)
१ टी स्पून ड्राय इस्ट
१ टी स्पून साखर
कोथंबीर बारीक चिरून, कसुरीमेथी व तीळ सजावटीसाठी
बटर किंवा साजूक तूप वरतून लावण्यासाठी
कृती: प्रथम मैदा चाळणीने चाळून घ्या. एका बाउलमध्ये कोमट पाणी घेवून त्यामध्ये ड्राय इस्ट व साखर मिक्स करून १० मिनिट बाजूला ठेवा.
एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये चाळलेला मैदा, मीठ, दही, तेल घालून मिक्स करून त्यामध्ये इस्टचे पाणी घालून मिक्स करून घ्या. मैदा मिक्स केल्यावर त्यामध्ये जरून असेल तर थोडे पाणी घालून पीठ मळून घेवून वरतून परत तेलाचा हात लाऊन पीठ बाउलमध्ये ठेवून बाउल वरती एक ओला न्यापकीन ठेऊन ३ तास बाजूला ठेवा. म्हणजे मळलेले पीठ छान फुलून येईल.
तीन तासा नंतर पीठ परत हातानी एक सारखे करून घेवून त्याचे एक सारखे ८ गोळे बनवून घ्या. एक गोळा पोळपाटावर हातानी थापून त्यावर बारीक चिरलेली कोथंबीर घालून थोडी दाबून लाटण्यानी पोळी सारखे लाटून घ्या खूप पातळ किंवा जाड लाटायचे नाही मध्यम लाटायचे.
नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवून त्यावर थोडे तेल लावून लाटलेला कुलचा किंवा नान भाजायला ठेवा मध्यम आचेवर भाजून झाल्यावर उलट करून परत थोडे तेल लावून दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्या. अश्या प्रकारे सर्व नान किंवा कुलचे बनवून घ्या.
नान किंवा कुलचा भाजून झाल्यावर सरव्हीग प्लेट मध्ये काढून त्यावर बटर किंवा साजूक तूप लावून ग्रेव्ही बरोबर सर्व्ह करा.
The Marathi language video of the same Kulcha / Naan recipe can be seen on our YouTube Channel-Punjabi Kulcha