कुरकुरीत पाकातले चिरोटे व टिप्स दिवाळी फराळसाठी
चिरोटे ही महाराष्ट्रीयन लोकांची पारंपारिक डीश आहे. दिवाळी फराळ म्हंटले की आपण लाडू. चिवडा, चकली, शेव, शंकरपाळे बनवतो. चिरोटे ही एक दिवाळी फराळ मधील एक छान डीश आहे. चिरोटे हे बनवायला थोडे किचकट आहेत कारण त्यामध्ये चांगले पापुद्रे सुटायला पाहिजे म्हणजे ते टेस्टी लागतात.चिरोटे बनवताना चांगले पापुद्रे सुटण्यासाठी काही टिप्स आपण लक्षात घेतल्यानंतर आपले चिरोटे एकदम मस्त बनतात. तसेच दही घातल्यामुळे चिरोटेला छान आंबट गोड अशी चव येते.
चिरोटे आपण पाकातील किंवा वरतून पिठीसाखर घालून सुद्धा सर्व्ह करू शकतो.
चिरोटे कसे बनवायचे त्याचे साहित्य व कृती आपण आमच्या साईटवर येथे पाहू शकता:
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: २०-२२ बनतात
साहित्य:
२ कप मैदा
२ टे स्पून तेल (कडकडीत मोहन)
मीठ चवीने (चिमूटभर)
१ टे स्पून दही
तळण्यासाठी तेल अथवा वनस्पती तूप
चिरोटे लाटण्याकरीता तांदळाची पिठी
साटाकरीता:
२ टे स्पून वनस्पती तूप
पाक बनवण्यासाठी:
२ कप साखर
१/२ कप पाणी
केशरी रंग किंवा केशर
कृती:
मैदा व मीठ चाळून एका बाऊलमध्ये घ्या मग त्यामध्ये कडकडीत तेलाचे मोहन घालून मिक्स करून थोडे पाणी व दही घालून पीठ मळून घ्या. पीठ मळताना फार घट्ट मळू नका.
साटा बनवण्यासाठी एका प्लेटमध्ये वनस्पती तूप घेऊन चांगले पांढरा रंग येई परंत फेटून घ्या.
मग मळलेल्या पीठाचे एक सारखे ४ गोळे बनवा. चारी गोळे तांदळाच्या पिठीवर पातळ चपाती/पोळी सारखे लाटून घेऊन एका ओल्या कापडावर ठेवा. मग एक चपाती घेऊन त्यावर तूप पसरवून घेवून त्यावर दुसरी चपाती ठेवा त्यालासुद्धा तूप लावा व वळकटी करून घ्या टोके कापून टाका व एक सारखे १०-११ भाग कापून घ्या. अश्या प्रकारे दुसरी वळकटी सुधा बनवून घ्या व एका भांड्यात झाकून ठेवा.
पोळपाटावर एक कापलेला गोळा घेवून कापलेली दिशा वरती घेवून एकदा हलक्या हातानी उभा लाटावा व आकडा आडवा लाटावा म्हणजे चौकीनी आकार येईल. अशा प्रकारे ८-१० चिरोटे लाटून घ्या.
कढईमधे तूप गरम करून त्यामध्ये २-३ चिरोटे सोडून झाऱ्यानी त्यावर तूप उडवत छान मंद विस्तवावर गुलाबी रंगावर दोनी बाजूनी तळून घ्या. मग एका चाळणीमध्ये तळलेले चिरोटे उभे करून ठेवा म्हणजे जास्तीचे तूप निथळून जाईल. अश्या प्रकारे सर्व चिरोटे बनवून घ्या.
एका जाड बुडाच्या कढईमधे साखर व पाणी एकत्र करून पाक बनवायला ठेवा. पाक बनवताना त्यामध्ये केशरी रंग किंवा केशर घाला व घट्ट पाक बनवा. मंद विस्तवावर पाक ठेवून एक एक चिरोटा घेवून पाकात उलट पालट करून परत चाळणीत उभा करून ठेवा. अश्या प्रकारे सर्व चिरोटे पाकातून काढा व चाळणीत उभे करून ठेवा. थंड झाल्यावर पाक सुकेल मग घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.
चिरोटे बनवण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स
मैदा घट्ट भिजवू नये. मैदा भिजवल्यावर लगेच १० मिनिटात चिरोटे बनवायला घ्या.
पोळी लाटताना तांदळाच्या पिठीवर हलक्या हातानी लाटा दाबून लाटू नका.
साटा बनवताना फक्त तूप फेसून घ्या. तांदळाची पिठी घालायची नाही.
चिरोटे लाटून झालेकी लगेच तळून घ्या. फार वेळ बाजूला ठेवू नका.
चिरोटे तळताना गुलाबी रंगावर मंद विस्तवावर तळून घ्या म्हणजे आतून कच्चे राहणार नाहीत.
चिरोटे जर पाकात नसतील घालायचे तर वरतून पिठीसाखर घालून सुद्धा छान लागतात.
The video in Marathi of the same recipe can be seen on our YouTube Channel – Sweet Chirote Recipe for Diwali Faral