स्वादिस्ट गोड पुरणाचे कडबू रेसिपी: आपण नेहमी सणावाराला किंवा होळी, पाडवा, दसरा ह्या दिवशी पुरणपोळी बनवतो. महाराष्ट्रातील लोकप्रिय पुरणपोळी ही डीश म्हणजेच पकवान आहे. आपण पुरणपोळी सुद्धा वेगवेगळ्याप्रकारे बनवतो.
पुरणपोळी बनवण्यासाठी आपण पुरण बनवले की त्याचे कडबू सुधा बनवू शकतो. पुरणाचे कडबू ही कोकण ह्या भागातील कोकणी लोकांची लोकप्रिय डीश आहे. पुरणाचे कडबू बनवायला सोपे आहेत व टेस्टी सुद्धा लागतात.
पुरणाचे कडबू आपण सणावाराला किंवा इतर दिवशी स्वीट डीश म्हणून सुद्धा बनवू शकतो.
पुरणाचे कडबू बनवतांना प्रथम गुळ साखर घालून पुरण बनवून घेवून मग पारीसाठी रवा, मैदा व गव्हाची कणिक घालून भिजवून त्याची करंजी बनवायची खर म्हणजे कडबू ही करंजी सारखीच डीश आहे.
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
सारणा करीता:
२५० ग्राम (२ कप) चणाडाळ,
२५० ग्राम साखर व गुळ (दोनी मिळून)
१ टी स्पून वेलचीपूड
१ टी स्पून जायफळ पूड
१० केशर काड्या
पारीकरीता:
१ कप बारीक रवा
१ कप गव्हाचे पीठ
१/४ कप मैदा
१ कप तेल
मीठ चवीने
१/२ कप तांदळाची पिठी
तळण्यासाठी तेल अथवा तूप
कृती: प्रथम हरबरा डाळ निवडून स्वच्छ धुवून घेवून शिजत ठेवावी व शिजताना त्यात १ टी स्पून तेल व १/४ टी स्पून हळद घालावी. डाळ चांगली बोट चेपी शिजलीकी चाळणीमध्ये उपसून घेवून सर्व पाणी निथळले की परत शिजलेली डाळ भांड्यात घालून त्यामध्ये साखर व गुळ घालून घट्ट होईस्तोवर शिजवून घ्या. पुरण इतके घट्ट शिजवावे की त्यामध्ये उलथने उभे केलेतर ते उभे राहिले पाहिजे. पुरण घट्ट झाले की त्यामध्ये वेलचीपूड, केशर, जायफळ पूड घालून चांगले मिक्स करून कोमट असतानाच पाट्यावर किंवा पुरण यंत्रामध्ये वाटून घ्यावे.
एका परातीत रवा घेवून त्यात थोडे पाणी घालून रवा थोडावेळ भिजत ठेवावा. रवा भिजला की त्यामध्ये गव्हाची कणिक, मैदा, मीठ व १/४ कप कडकडीत तेलाचे मोहन घालून पाणी वापरून चांगले घट्ट पीठ मळावे व एक तास तसेच झाकून बाजूला ठेवावे. नंतर मळलेल्या पीठाचे छोटे छोटे गोळे करून घ्या.
एक छोटा गोळा घेवून पुरी सारखा लाटून घेवून त्यामध्ये वाटलेले पुरण भरून पुरीला करंजीचा आकार देऊन त्याला छान मुरड घालावी. अश्या प्रकारे सर्व करंज्या बनवून घ्या.
एका कढईमधे तेल अथवा तूप गरम करून घ्या व पुरणाचे बनवलेले कडबू गुलाबी रंगावर तळून घ्या.
गरम गरम पुरणाचे कडबू सर्व्ह करा व सर्व्ह करतान वरतून तूप घाला.