डिलीशियस टी टाईम ब्राऊनी:
ब्राऊनी हा केकचा उत्तम प्रकार आहे. ब्राऊनी बनवायला अगदी सोपा आहे. आपण डेझर्ट म्हणून किवा दुपारी चहा बरोबर सर्व्ह करू शकतो. मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला सुद्धा मस्त आहे. ब्राऊनी लहान मुलांना व मोठ्यांना सुद्धा आवडतो.
ब्राऊनी बनवतांना अंडी, कोको पावडर कॉफी पावडर वापरली आहे त्यामुळे ब्राऊनीला छान थोडीशी अशी कडवट चव येते. तसेच ह्यामध्ये रम वापरली आहे त्यामुळे ह्याची टेस्ट अप्रतीम लागते. ब्राऊनी आपण वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो त्यातील हा एक सहज सोपा प्रकार आहे.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
बेकिंग वेळ: 40 मिनिट
वाढणी: 5-6 जणासाठी
साहीत्य:
1 1/2 कप मैदा
1/1/4 कप साखर
2 अंडी
3 टे स्पून कोको पावडर
1 टी स्पून कॉफी पावडर
3/4 कप लोणी
1/4 टी स्पून व्हनीला एसेन्स
1 टी स्पून बेकिंग पावडर
1 टी स्पून रम
1/4 टी स्पून मीठ
थोडे आक्रोड तुकडे
कृती:
प्रथम साखर मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. मग मैदा, कोको पावडर, कॉफी पावडर व मीठ चाळणीने चाळून घ्या.
लोणी व पिठी साखर चांगली फेसून घ्या. अंडी फोडून काटे चमचानी फेटून घ्या. फेटलेल्या लोणी साखरेत अंडी व चाळलेला मैदा घालून परत चांगले फेसून घ्या.
फेसलेल्या मिश्रणात व्हनीला एसेन्स, रम, बेकिंग पावडर घालून एक सारखे मिश्रण करून घेवून आक्रोडचे तुकडे घाला.
केकच्या भांड्याला तुपाचा हात लावून त्यामध्ये बनवलेले मिश्रण ओता एक सारखे करून घ्या,
मायक्रोवेव्ह किवा साधा ओव्हन प्रिहीट करून घ्या मग त्यामध्ये केकेचे भांडे ठेवून 40 मिनिट केक बेक करा. (मायक्रोवेव्हमध्ये केक बेक करताना 180 डिग्रीवर सेट करून 40 मिनिट ठेवा. केक झाल्यावर लगेच बाहेर न काढता 15 मिनिट तसाच ठेवा,
ब्राऊनी थंड झाल्यावर कापून मग चहा बरोबर सर्व्ह करा.