लोहडी स्पेशल पारंपारिक पद्धतीने क्रंची तिळाची रेवडी
लोहडी हा सण उत्तर भारतात लोकप्रीय सण आहे. लोहडी हा सण जानेवारी महीन्यात 12 किंवा 13 ह्या दिवशी साजरा करतात. पंजाबमध्ये ह्या दिवशी रात्री अग्नी प्रज्वलीत करून त्याच्या भोवती मुले मुली फेर धरून गाणी म्हणतात. पंजाबमध्ये ज्यांच्या कडे नुकताच मुलाचा विवाह झाला असेल किंवा कोणाच्या घरी मुलाचा जन्म झाला असेल त्यांच्या कडे हा सण अगदी आवर्जून करतात व सर्व मोहल्यामध्ये तिळाची रेवडी वाटतात. तिळची रेवडी हा एक पारंपारिक पदार्थ आहे. पंजाब मधील रेवडी हा लोकप्रीय स्वीट डीश आहे. रेवडी हा पदार्थ मकर संक्रांत किंवा लोहडी ह्या दिवशी अगदी आवर्जून बनवतात.
थंडीच्या दिवसात तिळ व गूळ ह्या पासून बनवलेले पदार्थ जरूर खावेत त्यामुळे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितवह आहेत. रेवडी बनवतांना आपण नेहमी जो गूळ वापरतो तो वापरला आहे. तसेच एक चिमुट सोडा वापरला आहे त्यामुळे रेवडी छान खुटखुटीत होते. म्हणजेच क्रंची होते. रेडवी तोडताना कट असा आवाज येतो. कट असा आवाज आला तर समजावे की आपली रेवडी अगदी परफेक्ट झाली आहे. तिळाची रेवडी बनवायला अगदी सोपी आहे. तसेच झटपट होणारी आहे.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 30-40 बनतात
साहीत्य:
2 कप तीळ
2 1/4 कप गूळ
1/2 टी स्पून साजूक तूप
2 टे स्पून पाणी
1 चिमुट सोडा
2-3 थेंब केवडा एसेन्स
कृती:
कढई गरम करून त्यामध्ये तीळ घालून मंद विस्तवावर खमंग भाजून घेवून बाजूला ठेवा. गूळ चीरून घ्या.
कढईमध्ये गूळ व पाणी घालून मंद विस्तवावर घट्ट पाक बनवून घ्या. वाटीमध्ये थोडेसे पाणी घेवून त्यामध्ये थोडासा पाक घालून बघा पाक पाण्यात लगेच वीरघळला नाही पाहिजे. मग पाकामध्ये सोडा घालून मिक्स करा मिक्स केल्यावर पाकाचा रंग लगेच बदलेल व थोडासा लाल रंग येईल. मग त्यामध्ये केवडा एसेन्स व भाजलेले तीळ घालून चांगले मिक्स करून घ्या.
गरम गरम मिश्रण एका प्लास्टीक पेपरवर काढून पेपर त्यावर फोल्ड करत थोडे थंड करा. मग हाताला तूप लावून परत थोडे मळून घ्या व छोटे छोटे चपटे गोळे बनवून घेवून थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा.
The video in Marathi of the Rewri recipe can be seen on our YouTube Channel – Til Ki Rewari for the Festival of Lohri