टेस्टी स्ट्रॉबेरी मार्बल केक: स्ट्रॉबेरी मार्बल केक दिसायला अगदी आकर्षक दिसतो तसेच टेस्टी सुद्धा लागतो. मुले अगदी आवडीने खातात. आपण मुलांच्या पार्टीला किंवा नाश्त्याला किंवा जेवण झाल्यावर डेझर्ट म्हणून सुद्धा सर्व्ह करू शकतो.
आपल्याला माहीती आहेच मार्बल कसा अप्रतीम दिसतो म्हणजे पांढरा व त्यामध्ये दुसर्या रंगाच्या छटा. तसेच ह्या केकेमध्ये अगदी फिकट पिवळा रंग व त्यामध्ये फिकट गुलाबी रंगाच्या छटा. स्ट्रॉबेरी मार्बल केक बनवताना पिवळा रंग व गुलाबी रंग वापरला आहे. त्यामुळे हा केक खूप आकर्षक दिसतो.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
बेकिंग वेळ: 30-35 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
2 कप मैदा
2 कप साख
2 कप लोणी
3 अंडी
1 1/2 चमचा बेकिंग पावडर
2 टे स्पून स्ट्रॉबेरी सॉस
1 टी स्पून व्हनीला एसेन्स
1-2 थेंब पिवळा रंग
कृती:
एका बाउल मध्ये अंडी फोडून काटे चमच्याने फेटून घ्या. साखर मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. मैदा व बेकीग पाउडर चाळणीने चाळून घ्या.
एका बाउलमध्ये लोणी हलक्या हातानी फेटून घ्या. त्यामध्ये पिठी साखर घालून परत चांगले फेटून घ्या. मग त्यामध्ये फेटलेले अंडे व मैदा घालून चांगले मिक्स करून घ्या. व्हनीला एसेन्स व पिवळा रंग घालून मिक्स करून घ्या. जर मिश्रण घट्ट वाटलेतर थोडेसे दूध वापरा.
केकच्या भांड्याला लोणी लावून वरतून मैदा भुरभुरा मग त्यामध्ये केकचे मिश्रण घालून स्ट्रॉबेरी सॉस घालून काटे चमचानी सॉस हळुवार पणे एकदा फिरवा.
मायक्रोवेव 180 डिग्रीवर 30-35 मिनिटवर सेट करून केकचे भांडे ठेवून बेक करून घ्या. केक झाल्यावर 10-15 मिनिट तसाच ओव्हनमध्ये ठेवा. थोडा थंड झाल्यावर बाहेर काढा.