कडक थंडीसाठी सहज सोपे झटपट बिनपाकाचे आपल्या बोनसाठी डिंकाचे लाडू
थंडी आली की आपण आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेतो कारण थंडी संपलीकी लगेच उन्हाळा सीझन चालू होतो त्यासाठी आपल्याला आपले आरोग्य चांगले ठेवावे लागते म्हणजे आपण उन्हाळा सीझन मध्ये आपली तब्येत छान ठेवू शकतो. थंडीसाठी सहज सोपे बिनपाकाचे हेल्दी डिंकाचे लाडू गोंद के लड्डू बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत. मुलांना आपण सकाळी नाश्त्याला, दुपारी दुधाबरोबर किंवा शाळेत जातांना डब्यात द्यायला सुद्धा मस्त आहे. कोणती स्त्री बाळंत झाली असेल तर तीला डिंकाचे लाडू अगदी आवर्जून खायला देतात.
थंडीच्या सीझनमध्ये मुद्दामून डिंकाचे लाडू बनवतात कारण ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हीतावाह आहेत. डिंकाचे लाडू बनवतांना डिंक, खारीक, बदाम, काजू, पिस्ते, खसखस, सुके खोबरे, गूळ व गव्हाचे पीठ वापरले आहे हे सर्व साहीत्य आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे. त्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्व मिळतात. ह्यामध्ये गव्हाचे पीठ थोडे वापरले आहे त्यामुळे लाडू मिळून येवून चांगला वळला जातो. व चवीलापण छान लागतो.
बनवण्यासाठी वेळ: 60 मिनिट
वाढणी: 25-30 मध्यम लाडू
साहीत्य:
2 वाट्या डिंक
3 वाट्या सुके खोबरे (किसून)
2 वाट्या खारीक पावडर
1/2 वाटी खसखस
1 वाटी कणीक (गव्हाचे पीठ)
2 वाट्या तूप
1 वाटी बदाम, काजू, पिस्ते व किसमिस
3 वाट्या गूळ (किसून)
1 वाटी पिठीसाखर
1 जायफळ पूड
कृती:
प्रथम डिंक थोडा जाडसर कुटून घ्या. खारीक कुटून बारीक पावडर करून घ्या किंवा आजकाल बाजारात रेडीमेड खारीक पावडर मिळते ती वापरली तरी चालेले. बदाम, काजू व पिस्ते थोडे जाडसर कुटून घ्या. सुके खोबरे किसून घ्या. जायफळची पावडर करून घ्या.
कढईमध्ये सुके खोबरे मंद विस्तवावर भाजून कुस्करून घ्या. खसखसपण मंद विस्तवावर भाजून घ्या. खारीक पावडर मंद विस्तवावर थोडी भाजून घ्या. कढईमध्ये थोडे तूप घेवून डिंक घालून चांगला फुलवून घ्या. (डिंक तुपात घातला की फुलतो व पांढरा होतो.) थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. त्याच कढईमध्ये थोडे तूप घेवून गव्हाचे पीठ मंद विस्तवावर गुलाबी रंगावर भाजून घ्या.
एका मोठ्या आकाराच्या बाऊलमध्ये किंवा परातीत पावडर केलेले डिंक, खारीक पावडर, भाजलेले सुके खोबरे, खसखस, काजू, बदाम, पिस्ते, किसमिस, जायफळ पूड, भाजलेले गव्हाचे पीठ, गूळ, पिठीसाखर घालून चांगले मिक्स करून घ्या. गरज भासल्यास अजून थोडे तूप गरम करून पातळ करून घाला व परत चांगले मिक्स करून घेऊन त्याचे लाडू वळून घ्या.
The video in Marathi of this Ladoo Making Method can be seen her – Healthy Dinkache Ladoo for Severe Winter