उपवासाचे साठवणीचे बटाटा वेफर्स
उपवासासाठी वर्षभर राहणारे बटाट्याचे जाळीदार वेफर्स आपण अगदी बाजार सारखे घरी बनवू शकतो. अश्या प्रकारचे वेफर्स बनवायला अगदी सोपे आहेत व झटपट होणारे आहेत तसेच ते वर्षभर टिकतात आपल्याला जेव्हा पाहिजे आपण तळू शकता.
बटाटा वेफर्स आपण नाश्त्याला किंवा कधी पण तळू शकतो. मुलांना असे वेफर्स खूप आवडतात.
बटाटा वेफर्स तळल्यावर वरतून चवीने मीठ, लाल मिरची पावडर व चाट मसाला घाला अगदी चवीस्ट लागतात.
बनवण्यासाठी वेळ: 60 मिनिट
वाढणी: 1 किलो ग्राम
साहीत्य:
1 किलो ग्राम मोठ्या आकाराचे बटाटे
कृती:
प्रथम बटाटे धुवून घ्या. एका मोठ्या आकाराच्या भांड्यात 2 लिटर पाणी गरम करून त्यामध्ये बटाटे घाला व भांड्यावर झाकण ठेवा. मोठ्या विस्तवावर बटाटे 10 मिनिट उकडून घ्या. मग विस्तव बंद करून 5 मिनिट तसेच झाकून ठेवा.
मग झाकण काढून बटाटे एका प्लेटमध्ये ठेवा थोडे कोमट झाल्यावर लगेच त्याची साले काढून घ्या.
वेफर बनवण्याची किसणी घ्या. जर वेफर मोठे हवे असतील तर बटाटा प्रथम आडवा किसून घ्या मग फिरवून परत किसून घ्या. म्हणजे वेफेर्स मोठ्या आकाराचे होतील.
जर वेफर्स मध्यम आकाराचे पाहिजे असतील तर बटाटा उभा धरून एकदा किसून झाल्यावर फिरवून परत किसा अश्या प्रकारे सर्व वेफर्स बनवून घ्या.
बनवलेले वेफर्स प्लॅस्टिक पेपरवर वाळत ठेवून उन्हात ठेवा एका बाजूनी वाळले की उलट करा व परत उन्हात वाळत घाला. चांगले वळलेकी डब्यात भरून ठेवा. पाहिजे तेव्हा तळून घ्या.
The Marathi language video of this Potato Wafers recipe can be seen here – Potato Wafers for Fasting Days