सुंदर स्वादिष्ट बेसन नारळाची बर्फी
Delicious Besan Coconut Barfi Besan Naralachi Barfi
बेसन नारळाची बर्फी स्वादिस्ट लागते अश्या प्रकारची बर्फी आपण सणावाराला किंवा इतर दिवशी सुद्धा बनवू शकतो. आपल्याला कधी गोड खावेशे वाटले की झटपट बेसन नारळाची बर्फी बनवता येते.
बेसन नारळाची बर्फी बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. दिसायाला सुद्धा आकर्षक दिसते. बेसन नारळाची बर्फी बनवतांना बेसन, नारळ, तूप व साखर वापरली आहे.
आपण बेसन बर्फी बनवतो त्यामध्ये आपल्याला तूप जास्त प्रमाणात वापरावे लागते पण बेसन नाराळाची बर्फी बनवताना अगदी कमी तुपात बनवता येते. तसेच छान खमंग लागते नारळ वापरल्यामुळे अगदी निराळी टेस्ट येते.
The Marathi language video of this Delicious Besan Coconut Barfi can be seen on our YouTube Channel: Delicious Besan Coconut Barfi Besan Naralachi Barfi
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 15 वड्या बनतात
साहीत्य:
1 कप बेसन
1 कप ओला नारळ (खाऊन)
2 टे स्पून तूप
1/2 टी स्पून विलची पावडर
1/4 टी स्पून जायफळ पावडर
4 बदाम, 4 काजू, 4 पिस्ते (उभे काप करून)
पाक बनवण्यासाठी:
1 कप साखर
1/2 कप पाणी
कृती: प्रथम नारळ खाऊन घ्या. बदाम, पिस्ते, काजू उभे पातळ काप करून घ्या. वेलची जायफळ पावडर करून घ्या. एका स्टीलच्या प्लेटला किंवा ट्रेला तूप लावून ठेवा.
नॉनस्टिक पॅनमध्ये तूप गरम करून घ्या. मग त्यामध्ये बेसन घालून मिक्स करून मंद विस्तवावर खमंग भाजून घ्या. बेसन खमंग भाजून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्याच पॅनमध्ये ओला खोवलेला नारळ घालून 4-5 मिनिट मंद विस्तवावर भाजून घ्या. मग एका प्लेटमध्ये काढून घ्या.
त्याच पॅनमध्ये साखर व पाणी घालून मंद विस्तवावर पाक बनवायला ठेवा. पाक आपल्याला एक तारी बनवायचा आहे. एक तारी पाक झाल्यावर त्यामध्ये भाजलेले बेसन व नारळ घालून चांगले मिक्स करा. गुठळी होता कामा नये. मग 2-3 मिनिट मंद विस्तवावर ठेवून मिश्रण थोडे घट्ट झालेकी तूप लावलेल्या प्लेटमध्ये मिश्रण काढून घ्या. एक सारखे सेट करून त्यावर ड्रायफ्रूटने सजवून थंड करायला ठेवा. थोडे कोमट झालेकी त्याच्या एक सारख्या वड्या कापून घ्या.
बेसन नारळाची बर्फी थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा.