महाराष्ट्रियन स्टाईल पेढ्याच्या साटोर्या रेसिपी
Quick Easy Maharashtrian Style Traditional Pedhyachya Satorya Sanjori Sanjuri
साटोर्या ही महाराष्ट्रियन लोकांची आवडती व लोकप्रिय डिश आहे. साटोर्या आपण दिवाळी फराळासाठी अथवा इतर सणावाराला सुद्धा बनवू शकतो. साटोर्या आपण वेगवेगळ्या प्रकारचे गोड सारण बनवून बनवू शकतो. त्यामध्ये आपण नारळाचे, खव्याचे सारण भरू शकतो.
पेढ्याच्या साटोर्या बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत. घरी पेढे उरले असतील तर आपण अश्या प्रकारच्या साटोर्या किंवा सांजोर्या आपण बनवू शकतो. पेढ्याच्या साटोर्या खूप टेस्टी लागतात. आता 10 वी व 12 वी बोर्डाचे रीझल्ट लागले आहेत तेव्हा घरात पेढे तर नक्कीच असणार तर अश्या प्रकारच्या साटोर्या किंवा सांजोर्या बनवून बघा.
पेढ्याच्या साटोर्या बनवतांना मैदा किंवा रवा व पेढे वापरले आहेत.
The Marathi language video of this Pedhyachya Satorya can be seen on our YouTube Channel: Maharashtrian Style Traditional Pedhyachya Satorya
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 12-14 बनतात
साहीत्य:
आवरणासाठी:
2 वाट्या मैदा किंवा बारीक रवा
1/4 टी स्पून मीठ
2 टे स्पून तूप (गरम मोहन)
तूप साटोर्या तळण्यासाठी
सारणासाठी:
7-8 पेढे
कृती: आवरणासाठी: एका बाऊलमध्ये मैदा किंवा रवा घेवून त्यामध्ये मीठ व कडकडीत तुपाचे मोहन घालून थोडे पाणी वापरुन घट्ट पीठ मळून घ्या. मळलेले पीठ 10-15 मिनिट झाकून बाजूला ठेवा.
सारणासाठी: दुसर्या एका बाऊल मध्ये पेढे घेवून किसून घ्या म्हणजे सारण छान मऊ होईल.
साटोर्या बनवण्यासाठी: मळलेल्या पिठाचे एक सारखे 12-14 गोळे बनवून घ्या. एक गोळा घेवून छोट्या पुरी सारखा लाटून घ्या. मग त्यामध्ये 1 चमचा पेढ्याचे सारण भरून पुरी बंद करून थोडशी जाडसर लाटून घ्या. पुरी मोठी लाटायची नाही. अश्या प्रकारे सर्व पुर्या बनवून घ्या.
कढमध्ये तूप गरम करून सर्व पुर्या गोल्डन रंगावर तळून घ्या. थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा.