चीज खारी बाईट्स व्हाइट सॉस मध्ये मुलांसाठी
Cheese Khari Bites For Kids Recipe In Marathi
चीज खारी बाईट्स ह्या स्टार्टर म्हणून किंवा टी टाईम किंवा मुलांना दुधा बरोबर सर्व्ह करू शकतो. खारी बाईट्स ही डिश बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. कोणी पाहुणे येणार असतील तर तेव्हा सुद्धा बनवायला मस्त आहे.
चीज खारी बाईट्स बनवताना व्हाईट सॉस बनवून घेतला आहे तसेच व्हाइट सॉस मध्ये कांदा, शिमला मिरची घातली आहे व वरतून चीज घातले आहे. खारी गरम केल्याने खूप कुरकुरीत व टेस्टी लागते. मुले अगदी आवडीने खातात.
The Marathi language video Cheese Khari Bites For Kids be seen on our YouTube Channel of: Cheese Khari Bites For Kids
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 10 बनतात
साहीत्य:
10 खारी (छोट्या आकाराच्या बॉम्बे खारी)
2 चीज क्युब (किसून)
¼ टी स्पून मिरे पावडर
1 टे स्पून बटर
व्हाइट सॉस करीता:
1 टे स्पून बटर
2 टे स्पून मैदा
¾ कप दूध
1 टी स्पून साखर
मीठ चवीने
आवरणासाठी:
1 टे स्पून बटर
2 टे स्पून कांदा (बारीक चिरून)
2 लसूण पाकळ्या (बारीक चिरून)
2 टे स्पून शिमला मिरची (बारीक चिरून)
मीठ चवीने
कृती:
प्रथम व्हाइट सॉस बनवून घ्या. त्यासाठी पॅनमध्ये बटर गरम करून त्यामध्ये मैदा घालून 2 मिनिट मंद विस्तवावर भाजून घ्या. मग त्यामध्ये थोडे थोडे दूध घालून मिक्स करून घेऊन मीठ व साखर घालून मिक्स करा. पूर्ण दूध घातल्यावर 1-2 मिनिट सॉस चांगला गरम करून घ्या. मग विस्तव बंद करून सॉस बाउलमध्ये काढून घ्या.
पॅनमध्ये बटर गरम करून घ्या, मग त्यामध्ये कांदा, लसूण व शिमला मिरची घालून मिक्स करून 1-2 मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये व्हाइट सॉस घालून मिक्स करून घ्या.
एका प्लेटमध्ये खारी घ्या. प्रतेक खारीवर एक एक चमचा सॉस घालून वरतून किसलेले चीज घाला.
नॉन स्टिक पॅन गरम करायला ठेवा. पॅनला थोडे बटर लावून घ्या. मग त्यावर सर्व खारी ठेवून पॅनवर झाकण ठेवा. 2-3 मिनिट खारी गरम झाल्यावर विस्तव बंद करून प्लेटमध्ये खारी काढून घ्या.
गरम गरम चीज खारी बाईट्स मुलांना दुधा बरोबर सर्व्ह करा.