वेज पुलाव अथवा व्हेजिटेबल राईस अगदी सोप्या पद्धतीने मुलांसाठी
Vegetable Rice Veg Pulao Vegetable Pulao For Kids Recipe In Marathi
मुले भाजी खायचा कंटाळा करतात. तेव्हा अश्या प्रकारचा वेज राईस बनवला तर त्या मुळे भाजी खाल्ली जाते. वेज राईस आपण दुपारी किंवा रात्री मेन जेवणात बनवू शकतो. वेज पुलाव बनवला की त्या बरोबर भजी, कबाब किंवा कटलेट बनवले तरी चालते.
वेज राईस आपण अगदी सोप्या पद्धतीने झटपट बनवू शकतो. कोणी घरी पाहुणे आले तर आपण अगदी पटकन अश्या प्रकारचा भात बनवू शकतो. वेज पुलाव फार तिखट बनवू नये मग मुले अगदी आवडीने खातील. समजा आपल्याला थोडा तिखट बनवायचा असेल तर त्यामध्ये कच्चा मसाला भाजून व कुटून घालावा.
The Marathi language video Tasty Easy Vegetable Rice Vegetable Pulao For Kids be seen on our YouTube Channel of Vegetable Rice Vegetable Pulao For Kids
वेज पुलाव बनवताना फ्लॉवर, शिमला मिरची, गाजर, मटार, बटाटा व बिन्स वापरले आहेत. त्यामुळे त्याची टेस्ट मस्त लागते.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
2 कप बासमती राईस
1 टे स्पून आले-लसूण पेस्ट
1 मध्यम आकाराचा कांदा (उभा पातळ चिरून)
½ कप फ्लॉवेर तुरे
1 छोटी शिमला मिरची (उभी पातळ चिरून)
1 छोटा टोमॅटो (बिया काढून चिरून)
1 छोटे गाजर (सोलून उभे पातळ चिरून)
5-6 बिन्स (शिरा काढून पातळ चिरून)
2 टे स्पून मटार
1 छोटा बटाटा (सोलून चौकोनी तुकडे करून)
1 टे स्पून तूप
मीठ चवीने
फोडणी करिता:
1 चमचा तेल
1 टे स्पून तूप
1 टी स्पून जिरे
3 लवंग
3-4 हिरवे वेलदोडे (वेलची)
1 तमाल पत्र
2 दालचीनी तुकडे
7-8 मिरे
7-8 काजू व बदाम
कृती: प्रथम तांदूळ धुवून बाजूला ठेवा. सर्व भाज्या स्वच्छ धुवून घ्या. कांदा उभा पातळ चिरून घ्या. शिमला मिरची उभी पातळ चिरून घ्या. गाजर सोलून उभे पातळ चिरून घ्या. फ्लॉवरचे तुरे काढून घ्या. बटाटा सोलून चौकोनी तुकडे करून घ्या. बिन्स शीरा काढून चिरून घ्या. टोमॅटो बिया काढून चिरून घ्या.
एका पॅनमध्ये तेल व तूप गरम करून मग त्यामध्ये काजू व बदाम तळून घेऊन बाजूला ठेवा. त्याच पॅन मध्ये अजून एक चमचा तूप घालून जिरे, लवंग, वेलदोडे, तमाल पत्र, दालचीनी, मिरे घालून थोडेसे परतून घेऊन उभा चिरलेला कांदा घालून गुलाबी रंगावर परतून आले-लसूण पेस्ट घाला. आले-लसूण पेस्ट थोडेशी परतून सर्व चिरलेल्या भाज्या घाला, थोड्या परतून 2 मिनिट पॅन वर झाकण ठेवून भाज्या वाफवून घ्या.
भाज्या वाफवून झाल्याकी त्यामध्ये धुतलेले बासमती तांदूळ व मीठ चवीने घालून 4-5 मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. पाणी गरम करायला ठेवा. पाणी कोमट असले तरी चालेल. पाणी कोमट झाल्यावर पॅनमध्ये घालून 1 टे स्पून तूप घालून मिक्स करून घ्या.
आता पॅनवर झाकण ठेवा 10-12 मिनिट मंद विस्तवावर भात शिजवून घ्या. मध्ये एकदा भात हळुवारपणे ढवळून घ्या. मग 12 मिनिट झाल्यावर विस्तव बंद करून भात तसाच 10 मिनिट झाकून ठेवा.
गरम गरम भात तळलेल्या काजू बदामनी सजवून सर्व्ह करा.
टीप: आपल्याला पाहिजे तर आपण कांदा उभा पातळ चिरून तळून वरतून सजावटीसाठी वापरू शकता. अश्या प्रकारचा भात कमी तिखट होतो त्यामुळे मुले अगदी आवडीने खातात. जर आपल्याला भात तिखट पाहिजे असेल तर कच्चा मसाला अजून थोडा घेऊन भाजून कुटून मग घालावा.