थंडी आली की स्ट्रॉबेरीचा सीझन चालू होतो. बाजारात लाल चुटुक ताज्या स्ट्रॉबेरी आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रॉबेरी नुसती खायला सुद्धा छान लागते व त्याचा केक तर अगदी अप्रतिम बनतो. आपण डेझर्ट म्हणून किंवा दुपारी चहा बरोबर किंवा मुलांसाठी डब्यात द्यायला सुद्धा अश्या प्रकारचा केक बनवू शकतो.
स्ट्रॉबेरी केक बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे. तसेच दिसायला सुद्धा आकर्षक दिसतो. जर आपल्याला फ्रेश स्ट्रॉबेरी मिळाली नाही तरी हरकत नाही आपण स्ट्रॉबेरीचा पल्प वापरुन सुद्धा केक बनवू शकतो. अश्या प्रकारचा केक आपण कुकरमध्ये बिना अंडे वापरता सुद्धा बनवू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 15 मिनिट
बेकिंग वेळ: 40-45 मिनिट
वाढणी: 6-8 जणसाठी
साहीत्य:
½ कप फ्रेश स्ट्रॉबेरी स्लाईस करून
1 ½ कप मैदा
¾ कप साखर
1 कप दूध
½ कप बटर किंवा तेल
1 टी स्पून लिंबुरस
½ टी स्पून व्हनीला एसेन्स
2 टे स्पून स्ट्रॉबेरी पल्प
1 ¼ टी स्पून बेकिंग पावडर
½ टी स्पून बेकिंग सोडा
थोडेसे तेल व मैदा बेकिंग ट्रेला लावण्यासाठी
कृती: प्रथम स्ट्रॉबेरी धुवून पुसून त्याचे उभे पातळ स्लाईस करून बाजूला ठेवा.
केकच्या भांड्याला तेल लावून वरतून मैदा भरुभुरून भांडे बाजूला ठेवा. कुकरची रिंग व शिटी काढून बाजूला ठेऊन गरम करायला ठेवा मग त्यामध्ये 1 मोठी वाटी मीठ घालून गरम करून घ्या. त्यामध्ये एक स्टँड ठेवा.
एका बाउलमध्ये दूध, साखर, तेल किंवा बटर घालून चांगले मिक्स करून घ्या. साखर पूर्ण विरघळली पाहिजे. साखर पूर्ण विरघळली की त्यामध्ये मैदा, स्ट्रॉबेरी पल्प, व्हनीला एसेन्स, लिंबुरस घालून मिक्स करून घ्या. सर्वात शेवटी बेकिंग पावडर व बेकिंग सोडा घालून हळुवार पणे मिक्स करून घ्या.
स्ट्रॉबेरी केकचे मिश्रण तयार झाले आता ते मिश्रण केकच्या भांड्यात ओतून एक सारखे करून घ्या वरतून स्ट्रॉबेरीचे स्लाईस लावून सजवून घ्या. मग भांडे गरम झालेल्या कुकरमधील स्टँडमध्ये ठेवा. कुकरचे झाकण लावा. विस्तव प्रथम 2-3 मिनिट मोठा ठेवा. मग विस्तव स्लो सीमवर ठेऊन केक 40 ते 45 मिनिट बेक करून घ्या. 40 मिनिट झाल्यावर एकदा केक चेक करून घ्या की पूर्ण बेक झाला आहेकी नाही व त्याचा रंग सुद्धा थोडा ब्राऊन झाला आहे की नाही. मग विस्तव बंद करून तसाच 5-7 मिनिट बंद ठेवा. मग केक चे भांडे बाहेर काढून थंड करायला ठेवा.
स्ट्रॉबेरी केक थंड झाल्यावर सर्व्ह करा किंवा थोडा गरम असताना सुद्धा सर्व्ह केला तरी मस्त लागतो.