बेसन लड्डू बिना घी बिना साखरेचा पाक बिना मावा रेसिपी
बेसन लाडू महाराष्ट्रातील लोकप्रिय लाडू आहेत. सर्वजण आवडीने खातात. आपण सणवाराला किंवा इतर दिवशी सुद्धा स्वीट डिश म्हणून बनवतो. बेसन लाडू छान खमंग लागतात. दिवाळीला फराळच्या ताटात बेसन लाडू तर हवेच त्याशिवाय आपला फराळ कसा पूर्ण होणार. बेसन लाडू बनवताना त्याला साजूक तूप बऱ्याच प्रमाणात लागते त्याशिवाय ते चांगले लाडू बनत नाहीत. बेसन लाडू आपण साखरेचा पाक बनवून किंवा बिना पाकाचे सुद्धा बनवतो तसेच त्यामध्ये काहीजण खवा सुद्धा वापरतात.
आपल्याला माहीत आहे का आपण बेसन लाडू बिना तुपाचे तसेच बिना साखरेच्या पाकाचे कसे बनवायचे. अश्या प्रकारचे बेसन लाडू छान खमंग व स्वादिष्ट लागतात व बनवायला जास्त वेळ सुद्धा लागत नाही. ह्या दिवाळीच्या फराळमध्ये अश्या प्रकारचे बेसन लाडू बनवून बघा.
The Marathi Besan Ladoo without Ghee can of be seen on our YouTube Channel of Besan Ladu w/o Ghee and w/o Sugar Syrup
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 15 लाडू बनतात
साहीत्य:
2 कप बेसन
½ कप फ्रेश क्रीम
1 ½ कप पिठीसाखर
¼ कप डेसिकेटेड कोकनट
2-3 टेबल स्पून दूध
¼ कप ड्रायफ्रूट
1 टी स्पून वेलची पावडर
कृती: साखर मिक्सरमधून बारीक करून घ्या. ड्रायफ्रूट चिरून घ्या. जर आपल्याला पिठीसाखरच्या आयवजी तगार म्हणजेच बुरा शक्कर वापरायची असेल तर अगोदर बनवून घ्या. तगार कसे बनवायचे ते ह्या अगोदर आपण पहिले आहे.
एका जाड बुडाची कढई किंवा नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवा. मग त्यामध्ये बेसन घेऊन मंद विस्तवावर कोरडेच गुलाबी रंगावर खमंग भाजून घ्या. साधारणपणे बेसन मंद विस्तवावर भाजायला 12-15 मिनिट लागतील.
बेसन भाजून झाल्यावर त्यामध्ये फ्रेश क्रीम घाला. फ्रेश क्रीम म्हणजे आपण रोजचे दूध गरम करून थंड झाल्यावर फ्रीजमद्धे ठेवतो. जेव्हा आपण काही तासांनी दुधाचे भांडे बाहेर काढतो तेव्हा त्यावर छान जाड भाकरी सारखी साय येते ती साय आपण 2 दिवसाची साठून ठेवायची म्हणजे अश्या प्रकारचे लाडू बनवताना वापरता येते. बेसन मध्ये फ्रेश क्रीम घातल्यावर 4-5 मिनिट मंद विस्तवावर भाजून घ्या. मग त्यामध्ये ड्रायफ्रूट (काजू/बदाम/पिस्ते/किसमिस) घालून डेसिकेटेड कोकनट घालून मिक्स करून 1-2 मिनिट भाजून घ्या. आता विस्तव बंद करून मिश्रण थंड करायला ठेवा.
बेसनचे मिश्रण थंड झालेकी त्यामध्ये पिठीसाखर किंवा तगार, वेलची पावडर घालून मिक्स करून घ्या. आता मिश्रणाचे दोन भाग करा. एका भागामध्ये 1 टे स्पून दूध घालून मिश्रण चांगले मळून घ्या. जर मिश्रण कोरडे वाटले तर अजून एक चमचा दूध घालून मिक्स करून मग लाडू वळा. एक टीप लक्षात ठेवा एकदम दूध जास्त घालू नका नाहीतर मिश्रण सैल होऊन लाडू वळता येणार नाहीत. जर मिश्रण सैल झालेतर दुसऱ्या भागातील मिश्रण वापरू शकता. सर्व लाडू वळून झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.