टेस्टी कुरकुरीत कांदा बटाटा भजी पकोडा अगदी निराळी पद्धत
पावसाळा सीझन चालू झाला की आपण निरनिराळ्या प्रकारची भजी बनवतो. त्यामध्ये कांदा भजी, बटाटा भजी, पालक भजी. मिरची किंवा शिमला मिर्चची भजी ई. अश्या प्रकारची भजी आपण दुपारी चहा बरोबर सर्व्ह करू शकतो किंवा जेवणात सुद्धा बनवू शकतो.
आपण कांदा-बटाटा भजी बनवली आहेत का? बनवून बघा खूप टेस्टी लागतात. सगळे अगदी आवडीने खातील. कांदा बटाटा भजी मस्त कुरकुरीत व टेस्टी लागतात. बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहेत. घरी कोणी पाहुणे आलेतर अश्या प्रकारची निराळी भजी बनवता येतील. बटाटा किसून वापरला आहे त्यामुळे भजी मस्त कुरकुरीत लागतात.
The Marathi Kanda Batata Bhajji can of be seen on our YouTube Channel of Kurkurit Onion Potato Pakoda Pakora
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहीत्य:
2 मध्यम आकाराचे कांदे (उभे पातळ चिरून)
2 मध्यम आकाराचे बटाटे (सोलून किसून)
3 टे स्पून बेसन
1 टे स्पून तांदळाचे पीठ
2 टे स्पून कोथिंबीर (चिरून)
2 हिरव्या मिरच्या (चिरून)
1 टी स्पून आले (बारीक चिरून)
½ टी स्पून लाल मिरची पावडर
¼ टी स्पून हळद
¼ टी स्पून हिंग
½ टी स्पून धने पावडर
½ टी स्पून ओवा (चोळून)
1 टे स्पून तेल (गरम)
मीठ चवीने
तेल तळण्यासाठी
कृती:
प्रथम कांदे सोलून उभे पातळ चिरून घ्या. बटाटे साल काढून मोठ्या भोकाच्या किसणीने किसून 2-3 वेळा पाण्यानि धुवून घ्या. त्याचा सगळा राप गेला पाहिजे. हिरवी मिरची व कोथिंबीर धुवून चिरून घ्या. आले कुटून घ्या.
एका बाउलमध्ये चिरलेला कांदा, किसलेला बटाटा, कोथिंबीर, आले, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, हळद, हिंग, ओवा, तांदळाचे पीठ, बेसन, मीठ चवीने, तेलाचे मोहन घालून मिक्स करून वरतून कडकडीत तेल घालून मिक्स करा. (पाणी आजिबात वापरायचे नाही)
कढईमध्ये तेल चांगले गरम झाल्यावर त्यामध्ये छोटी छोटी भजी घालावी. भजी तेलात घालताना हळुवार पणे घालावी मिश्रण दाबू नये. दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत तळून घ्या.
गरम गरम कांदा बटाटा भजी टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.