महाराष्ट्रियन सीकेपी स्टाइल सोडे वापरुन पोहे रेसीपी
पोहे ही डिश महाराष्ट्रामधील लोकप्रिय डिश आहे. आपण कांदा पोहे, बटाटा पोहे, मटार पोहे बनवतो. पण सोंडे वापरुन पोहे बनवून बघा खूप छान चविष्ट लागतात. पोहे आपण नाश्तासाठी किंवा भूक लागली की किंवा कोणी पाहुणे आले की झटपट बनवू शकतो.
The Maharashtrian CKP Style Sode Pohe | Dry Prawns Pohe Video In Marathi be seen on our You tube Chanel Maharashtrian CKP Style Sode Pohe | Dry Prawns Pohe
सोडे वापरुन पोहे बनवायला अगदी सोपे आहेत. सोडे पोहे बनवताना आल-लसूण, कांदा, बटाटा, हिरवी मिरची, हळद लिंबूसर व कोथिंबीर वापरली आहे. सोडे वापरुन पोहे ही एक छान ब्रेकफास्टसाठी डिश आहे. सीकेपी किंवा कोंकणी लोक अश्या पद्धतीने पोहे बनवतात.
बनवण्यासाठी वेळ: 15-20 मिनिट
वाढणी: 3 जणसाठी
साहित्य:
2 कप पोहे (जाड)
¼ कप सोंडे
1 मध्यम आकाराचा कांदा (चिरून)
1 छोटा बटाटा (सोलून,चिरून)
3-4 हिरव्या मिरच्या
1 टे स्पून आल-लसूण पेस्ट किंवा कुटून
1 टे स्पून लिंबुरस
¼ कप कोथिंबीर
मीठ चवीने
फोडणी करिता:
2 टे स्पून तेल
¼ टी स्पून हिंग
सजावटी करिता:
ओले खोबरे व कोथिंबीर
कृती: प्रथम सोंडे धुवून पाण्यात 30 मिनिट भिजत ठेवा. कांदा चिरून घ्या. कोथिंबीर व हिरवी मिरची धुवून बारीक चिरून घ्या. मग पोहे भिजवून निथळत ठेवा. पोहे निथळले की 5 मिनिट नंतर त्याला लिंबुरस, मीठ लाऊन बाजूला ठेवा. पोहे चांगले मोकळे झाले पाहिजे.
कढईमध्ये तेल गरम करून मग त्यामध्ये हिंग घालून कांदा घालून 2 मिनिट परतून घ्या. मग आल-लसूण व हिरवी मिरची घालून परतून घ्या. आता भिजवलेले सोंडे, हळद व थोडेसे मीठ (मीठ थोडे घाला कारणकी आपण पोह्याला सुद्धा मीठ लावून ठेवणार आहोत.) घालून थोडे परतून कढईवर झाकण ठेवून मंद विस्तवावर 5-7 मिनिट शिजवून घ्या. पाणी आजिबात घालायचे नाही.
सोंडे शिजले की त्यामध्ये भिजवलेले पोहे घालून कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या. कढईवर झाकण ठेवून 2-3 मिनिट चांगली वाफ येवू ध्या.
गरम गरम सोंडे घातलेले पोहे कोथिंबीर व ओला नारळ घालून सर्व्ह करा.