महाराष्ट्रीयन झणझणीत खमंग गरम मसाला मटन, चिकन, अंडाकरी व आमटीसाठी
एप्रिल मे महिना आला की बाजारात लाल मिरच्या, हळकुंड दिसायला लागतात. मग आपण वर्षभरासाठी साठवणीचा गरम मसाला, लाल मिरची पावडर बनवून ठेवतो. ह्या दिवसांत महिलांना जास्त उत्साह असतो म्हणजे बाजारातून मिरच्या आणणे ऊन देणे त्याची देठ काढणे मग कडकडीत उन्हात ठेवून मग सर्व गरम मसाले व मिरच्या तेलात भाजून घेणे. मग मिरची कांड किंवा गिरणी मधून दळून आणणे.
The Maharashtrian Tasty Spicy Garam Masala Mutton, Chicken, Anda Curry Amti Sathi Video In Marathi be seen on our You tube Chanel Maharashtrian Tasty Spicy Garam Masala
महाराष्ट्रमधील कोकण ह्या भागात जास्ती करून घराच्या पडवीत उखळ बसवतात मग त्या उखळीमध्ये घरातील महिला मसाला छान बारीक कुटतात. घरच्या मसाल्याची चव ही न्यारीच लागते.
गरम मसाला बनवायला अगदी सोपा आहे. आज आपण जो महाराष्ट्रियन पद्धतीने गरम मसाला बनवणार आहोत त्यामध्ये सर्व प्रकारचे कच्चे मसाले वापरले आहेत. तसेच ह्या मध्ये बेडगी मिरची वापरली आहे त्यामुळे आमटीला रंगपण छान येतो. जर आपणाला मसाला खूप तिखट पाहिजे असेलतर निम्मी बेडगी मिरची व निम्मी कोल्हापुरी मिरची वापरा.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 1 किलोग्राम बनतो
साहित्य:
½ किलो (500 ग्राम) बेडगी मिरची
¼ किलो (250 ग्राम) धने
½ वाटी किंवा कप जिरे
25 ग्राम खसखस
½ टे स्पून लवंग
1 टे स्पून हिरवे वेलदोडे
15 मोठी तमालपत्र
4 हळकुंड
3 सुंठ
2 मोठे तुकडे खडे हिंग
1 छोटी वाटी ओवा
25 ग्राम दगडफुल
25 ग्राम मसाला वेलची
25 ग्राम चक्रफूल
25 ग्राम नागेश्वर
25 ग्राम जायपत्री
25 ग्राम मेथीदाणे
1 ½ – 2 वाट्या सुके खोबरे (किसलेले)
1 जायफळ
1 वाटी तेल मसाला तळण्यासाठी
कृती: प्रथम बेडगी मिरची उन्हात सुकवून त्याचे देठ काढून टाका. सुके खोबरे किसून घ्या.
धने कोरडेच भाजून घ्या.
एका मोठ्या आकाराच्या कढई मध्ये ¼ टी स्पून तेल घालून त्यामध्ये निम्मे लवंग तळून घ्या निम्मे आपल्याला कच्चेच घालायचे आहे.
¼ टी स्पून तेलात हिरवे वेलदोडे निम्मे तळून घ्या. निम्मे तसेच मसालामध्ये घालायचे आहे.
1 टी स्पून तेलात तमालपत्र भाजून घ्या. मग 1 टी स्पून तेलात हळकुंड सुंठ व ओवा वेगवेगळे भाजून घ्या.
ओवा, दगडफुल, चक्रफूल, नागेश्वर, जायपत्री कोरडे भाजून घ्या.
1 टी स्पून तेलात मेथीदाणे परतून घ्या.
किसलेले सुके खोबरे मंद वस्तवावर कोरडेच भाजून घ्या. कारणकी खोबऱ्यामद्धे तेल असते.
सर्वात शेवटी मिरच्या तेलात परतून घ्या. मिरच्या भाजताना थोडे थोडे तेल गरम करून थोड्या थोड्या मिरच्या घालून मंद विस्तवावर भाजून घ्या.
सर्व साहित्य भाजूनकिंवा तळून झाल्यावर थंड होऊ द्या मग मिक्स करून डब्यात भरून ठेवा.
जर आपल्या पाहिजे तर मिरची कांड जेथे असेल तेथे आपला गरम मसाला व खडे मीठ घेऊन छान बारीक कुटून घ्या. मसाला चाळून झाल्यावर जो जाडसर मसाला चाळणीत राहील तो आपण चटणी बनवताना वापरू शकतो.
जर आपण गरम मसाला गिरणीतून दळून आणणार असालतर मीठ नेऊ नका कारणकी गिरणी वाले मीठ घातलेला मसाला दळून देत नाहीत. आपण घरी आल्यावर खडेमीठ थोडे मिक्स करून बरणीत भरून ठेवू शकता.
टीप: सर्व मसाले भाजताना मंद विस्तवावर भाजा व थोडासा ब्राऊन रंग येई पर्यन्त भाजा म्हणजे आपल्या मसाल्याला रंग चांगला येतो.