चिकन भुना मसाला हॉटेल सारखा रेसीपी
आपण ह्या अगोदर चिकनचे विविध प्रकार कसे बनवायचे ते पाहिले. आता आपण चिकन ग्रेव्ही कशी बनवायची ते पाहू या. चिकन भुना मसाला ही रेसीपी बनवायला अगदी सोपी आहे. तसेच चविष्ट लागते. आपण कोणी पाहुणे येणार असतील व आपला नॉनव्हेज करायचा बेत असेलतर अश्या प्रकारचे चिकन बनवू शकतो.
चिकन भुना मसाला बनवताना प्रथम चिकनला थोडासा मसाला लाऊन बाजूला झाकून ठेवायचे मग तो पर्यन्त आपण दुसरी तयारी करू शकतो. चिकन भुना मसाला आपण जिरा राईस व पराठा बरोबर सर्व्ह करू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
चिकन मैरीनेट करण्यासाठी:
300 ग्राम चिकन
1 टी स्पून लिंबूरस
1 टे स्पून आल-लसूण पेस्ट
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टे स्पून धने-जिरे पावडर
½ टी स्पून हळद
3 टे स्पून दही
½ टी स्पून गरम मसाला
मीठ चवीने
चिकन ग्रेव्हीसाठी:
1 टे स्पून तेल
1 तमालपत्र
2 लवंग
7-8 मिरे
1” दालचीनी तुकडा
½ टी स्पून जिरे
2 हिरवे वेलदोडे
1 चक्रफूल
2 मध्यम आकाराचे कांदे
2 मध्यम आकाराचे टोमॅटो
1 टे स्पून आल-लसूण पेस्ट
1 टी स्पून बडीशेप
2 लाल सुक्या मिरच्या
2 हिरव्या मिरच्या
1 टी स्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
2 टी स्पून चिकन मसाला
मीठ चवीने
कोथिंबीर सजावटीकरिता
कृती: चिकन मैरीनेट करण्यासाठी: प्रथम चिकन स्वच्छ धुवून एका बाउलमध्ये ठेवा. मग त्यामध्ये लिंबूरस, आल-लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, धने-जिरे पावडर, हळद, दही, गरम मसाला व मीठ मिक्स करून झाकून 30 मिनिट बाजूला ठेवा.
कांदा बारीक चिरून घ्या, टोमॅटो उकडून त्याची साल काढून मिक्सरमधून बारीक करून बाजूला ठेवा. कोथिंबीर धुवून बारीक चिरून बाजूला ठेवा.
एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे, लवंग, मिरे, तमालपत्र, हिरवे वेलदोडे, दालचीनी घालून थोडे गरम करून चिरलेला कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घ्या. मग त्यामध्ये आल-लसूण पेस्ट घालून 2 मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये लाल मिरची, हिरवी मिरची व बडीशेप घालून मग टोमॅटो पयूरी घालून 2-3 मिनिट परतून घ्या.
आता त्यामध्ये चिकन मैरीनेट केलेले घालून 5 मिनिट परतून घ्या. परतून घेताना पाणी घालू नका कारण की चिकनचे पाणी सुटेल त्यामध्ये चिकन परतून घ्या. मग त्यामद्धे जरूरत असेल तेव्हडे पाणी घाला साधारण पणे 2 कप पाणी घालून मिक्स करून कढईवर झाकण ठेवून मंद विस्तवावर 10-12 मिनिट शिजू द्या.
गरम गरम चिकन भुना मसाला जिरा राईस व पराठा बरोबर सर्व्ह करा.