बेस्ट परफेक्ट मुगलाई चिकन बिर्याणी हॉटेल सारखी
चिकन बिर्याणी ही सर्वांना आवडते. आपण वन डिश मिल म्हणून सुद्धा बनवू शकतो. चिकन बिर्याणी बरोबर फक्त रायता बनवले तरी चालते.
आज आपण मुगलाई पद्धतीने चिकन बिर्याणी बनवणार आहोत. ह्या पद्धतीने आपण बिर्याणी बनवली तर घरात सर्वाना आवडले इतकी चविष्ट लागते. मुल तर अगदी आवडीने खातील.
The text Best Perfect Mughlai Chicken Biryani Restaurant Style in Marathi be seen on our You tube Chanel Best Perfect Mughlai Chicken Biryani
मुगलाई पद्धतीने चिकन बिर्याणी बनवताना प्रथम भात बनवताना त्यामध्ये एक चमचा आल-लसूण पेस्ट व खडा मसाला घालून एक चमचा तूप व मीठ घालून बनवा त्यामुळे खूप छान टेस्ट येते. आपण घरी कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता.
चिकन मॅरीनेट करताना किमान 2 तास तरी भिजवून ठेवावे म्हणजे छान मुरत. तसेच कांदा तळून बिर्याणी लेयर बनवताना घातला तर त्यामुळे बिर्याणीला रंग व चव छान येते. चिकन मॅरीनेट करताना मसाला आपण आयता सुद्धा आणू शकता किंवा घरी सुद्धा खूप छान बनवू शकता. त्याची सुद्धा रेसिपी लिंक दिली आहे येथे क्लिक करा. (बिर्याणी मसाला)
तयारी करण्यासाठी वेळ: 20 मिनिट
बिर्याणी दम करण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणांसाठी
साहित्य:
2 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून छान कुरकुरीत तळून बाजूला ठेवा. 5-6 केसरच्या काड्या दुधात भिजत घाला. 3 टे स्पून तूप बिर्याणी मध्ये घालण्यासाठी घ्या.
चिकन मॅरीनेट कसे करायचे:
3 टे स्पून तेल (मसाला फ्राय करण्यासाठी)
500 ग्राम चिकन
1 कप दही
2 टी स्पून लाल मिरची पावडर
1/2 टी स्पून हळद
1 टी स्पून धने-जीरे पावडर
1 छोटा टोमॅटो (चिरून)
1 कप कोथिंबीर (धुवून चिरून)
1 मोठे लसूण काण्ड (सोलून)
1” आल तुकडा
2 हिरव्या मिरच्या
1/4 कप पुदिना पाने
1 टे स्पून चिकन बिर्याणी मसाला
मीठ चवीने
बिर्याणी भात कसा बनवायचा:
2 कप बासमती तांदूळ:
4 लवंग
2 हिरवे वेलदोडे
1 मोठा दालचीनी तुकडा
10-12 मिरे
1 टी स्पून शहाजिरे
1 चक्रफूल
1 मोठे तमालपत्र
थोडीशी जायपत्री
मीठ चवीने
1 टे स्पून तूप किंवा तेल
कृती: चिकन मॅरीनेट करण्यासाठी: प्रथम चिकन पिसेस धुवून घ्या. कोथिंबीर, आल-लसूण-हिरवी मिरची व पुदिना बारीक वाटून घ्या.
एका बाउलमध्ये चिकन पिसेस, वाटलेला मसाला, दही, टोमॅटो, लाल मिरची पावडर, हळद, चिकन बिर्याणी मसाला, धने-जिरे पावडर, मीठ मिक्स करून घेऊन झाकून 2 तास फ्रीजमध्ये ठेवा.
बिर्याणी भात बनवण्यासाठी: तांदूळ धुवून 15-20 मिनिट झाकून बाजूला ठेवा. आता कुकरमद्धे पाणी गरम करायला ठेवावे. (2 वाट्या तांदूळ आहेतर 4 वाट्याला थोडेसे कमी पाणी घ्या) मग त्यामध्ये 1 चमचा आल-लसूण कुटून, खडा मसाला, तूप किंवा तेल व मीठ घालून धुतलेले तांदूळ घालावे. मिक्स करून कुरकरचे झाकण लावून 2 शिट्या काढाव्या. कुकरचे झाकण निघाले की वाफ गेल्यावर भात हळुवार पणे ढवळून परातीत काढून घ्या म्हणजे छान मोकळा होईल.
कुकरमद्धे तेल गरम करून त्यामध्ये चिकन मॅरीनेट केलेले घालून छान खमंग होई पर्यन्त फ्राय करून घ्या. मग कुकरचे झाकण लावून मोठ्या फ्लेमवर 2 शिट्या (बोनेलेस चिकन) काढा. जर लेग पीस वापरणार असाल किंवा विथ बोन चिकन वापरणार असाल तर 3 शिट्या काढल्या तरी चालेल. कुकरचे झाकण निघाले की चिकन बाहेर काढून घ्या.
आता आपण मुगलाई चिकन बिर्याणीचे लेयर द्यायचे त्यासाठी कुकरमद्धे प्रथम थोडे चिकन मग थोडा शिजवलेला भात, त्यावर तळलेला कांदा, मग परत चिकन मग भात मग त्यावर केसरचे दूध घालावे. कुकरचे झाकण लावून घ्या. विस्तवावर तवा गरम करायला ठेवा. त्यावर कुकर ठेवा. प्रथम 2-3 मिनिट विस्तव मोठाच ठेवा मग मंद विस्तवावर 10-15 मिनिट बिर्याणी चांगली गरम होऊ द्या.
मग गरम गरम मुगलाई चिकन बिर्याणी रायता बरोबर सर्व्ह करा.