टेस्टि खानदेशी भेंडीचा ठेचा एकदा करून पहाच
भेंडीची भाजी लहान मुले व मोठी माणसे सुद्धा अगदी आवडीने खातात. आपण नेहमी भरलेली भेंडी, मसाला भेंडी किंवा चकत्या करून भेंडीची भाजी बनवतो.
आज आपण अगदी निराळ्या पद्धतीने भेंडीची भाजी बनवणार आहोत. भेंडीचा ठेचा आपण आईकला आहे का? भेंडीचा ठेचा बनवायला अगदी सोपा व झटपट होतो तसेच स्वादिष्ट लागतो. आपण अश्या प्रकारे भेंडीचा ठेचा बनवला तर आपण ताट अगदी चाटून पुसून खाल.
टेस्टि खानदेशी भेंडीचा ठेचा ह्याचा शॉर्ट विडियो आपण येथे क्लिक करून पाहू शकता: भेंडीचा ठेचा
ठेचा म्हणजे आपण मिरचीच ठेचा बनवतो तो आपण खलबत्यात किंवा दगडी मध्ये कुटून बनवतो. तसेच ह्या मध्ये मसाला कुटून भेंडी सुद्धा थोडीशी मसलून घ्यायची आहे. त्यामुळे त्याची टेस्ट खूप छान लागते.
बनवण्यासाठी वेळ: 15-20 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
250 ग्राम भेंडी
3 टे स्पून तेल
1 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हिंग
1 मध्यम आकाराचा कांदा (चिरून)
1 /4 टी स्पून हळद
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून गरम मसाला
1 टी स्पून धने-जिरे पावडर
1 टी स्पून लिंबुरस
मीठ चवीने
8-10 लसूण पाकळ्या
4-5 हिरव्या मिरच्या
1/4 कप शेंगदाणे
1/4 कप कोथिंबीर
कृती:
एका पॅनमध्ये लसूण हिरव्या मिरच्या चांगल्या भाजून घ्या. मग शेंगदाणे भाजून साल काढून घ्या.
खलबत्यात भाजलेला लसूण, हिरव्या मिरच्या, शेंगदाणे व कोथिंबीर कुटून घेऊन बाजूला ठेवा.
भेंडी धुवून, पुसून त्याची टोक कापून टाका. मग एका भेंडीचे 1”चे तुकडे करून घ्या. एक तुकडा घेऊन त्याचे उभे 4 तुकडे कापा म्हणजे मधोमध कापायची. कांदा चिरून घ्या.
एक पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे, हिंग घालून चिरलेला कांदा घालून थोडा परतून घ्या. मग त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, धने-जिरे पावडर घालून मिक्स करून भेंडी घाला एकसारखी मिक्स करून झाकण ठेवून 2-3 मिनिट तसेच ठेवा. म्हणजे भेंडी वाफेवर थोडीशी शिजेल.
मग झाकण काढून 2-3 मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये मीठ चवीने, लिंबुरस व कुटलेला मसाला घालून मिक्स करून परत 2-3 मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये थोडेशी भेंडी कढईत बाजूला घेऊन ती ठेचून घेऊन परत बाकीच्या भाजीत मिक्स करून घ्या.
आता गरम गरम भेंडीचा ठेचा चपाती बरोबर सर्व्ह करा.