नागपंचमी स्पेशल कोकणातील गोड खांटोळी
श्रावण महिना चालू झाला की आपले सणवार सुरू होतात. लगेच पहिला सण येतो तो महिलांचा आवडतीचा नाग पंचमी. मग महिलांची लगभग चालू होते.
नागपंचमी ह्या सणाला महिला जरीची साडी नेसून अंगावर दाग दागिने घालून हातात पूजेची थाळी घेऊन वारुळा जवळ नागोंबाची पूजा करायला जातात.
नागपंचमी ह्या दिवशी विस्तवावर तवा ठेवायचा नसतो. त्यामागे एक कहाणी आहे. नागदेवाला नेवेद्य म्हणून गोड पदार्थ सुद्धा पाहिजे. कोकणात गोड खांटोळी बनवायची पद्धत आहे. खांटोळी बनवण्यासाठी
तांदळाची पीठ व ओले खोबरे वापरतात. खांटोळी बनवायला अगदी सोपी आहेत व स्वादिष्ट सुद्धा लागतात.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 30-35 वड्या बनतात.
साहित्य :
1 कप बासमती तांदूळ
1/4 कप तूप
3/4 कप गूळ
1 टी स्पून वेलची पावडर
1 टी स्पून सुंठ पावडर
मीठ चवीने
3/4 कप ओल खोबर (किसून)
ड्राय फ्रूट सजावटी करिता
कृती: तांदूळ धुवून रात्रभर कापडावर वाळत ठेवा. मग सकाळी मिक्सर मध्ये रवाळ दळून घ्या.
एक कढई मध्ये तूप गरम करून तांदळाचे पीठ छान गुलाबी रंगावर भाजून घ्या. मग त्यामध्ये ओले खोबरे घालून ते पण थोडे भाजून घ्या.
दुसऱ्या एका भांड्यात 3 कप पाणी गरम करायला ठेवा त्यामध्ये गूळ विरघळवून घ्या. मग त्यामध्ये वेलची पावडर, सुंठ पावडर घालून मिक्स करून घ्या. आता ही गरम गरम मिश्रण भाजलेल्या तांदळाच्या पिठात घालून मिक्स करून थोडे घट्ट होई पर्यन्त गरम करा. मग मिश्रण घट्ट झालेकी तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढून एक सारखे थापुन घेऊन वरतून खोबरे व ड्राय फ्रूट घालून सजवून थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापून घ्या. वड्या कापल्यावर नेवेद्य दाखवा.