साबूदाणा पिठाची बर्फी उपवाससाठी
Sabudana Pithachi Barfi Upwasasathi Recipe in Marathi
नवरात्रीमध्ये 9 दिवस उपवास असतात मग रोज फराळ करण्यासाठी काय करायचे तसेच ते पचनास हलके व बनवण्यास सोपे व झटपट कसे बनयावचे.
आपण आज एक छान उपवासचा गोड पदार्थ बनवणार आहोत. आपण उपवासची झटपट बर्फी किंवा वडी बनवू शकतो.
उपवासची बर्फी किंवा वडी बनवण्यासाठी आपण साबूदाणा वापरणार आहोत. बर्फी बनवण्यासाठी साबूदाणा भिजवायचा नाही फक्त तो पुसून घेऊन मिक्सरमध्ये बारीक ग्राइंड करून घ्यायचा आहे.
आपण अश्या प्रकारची बर्फी किंवा वडी उपवासाला किंवा इतर वेळी सुद्धा स्वीट डिश म्हणून बनवू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 12-15 वड्या बनतात
साहित्य:
1/2 कप साबूदाणा
2 टे स्पून तूप
2 टे स्पून डेसिकेटेड कोकनट
2 कप फूल क्रीम दूध
2 टे स्पून क्रीम
1/4 कप साखर
1 टी स्पून वेलची पावडर
ड्रायफ्रूट सजावटीसाठी
कृती: प्रथम साबूदाणा स्वच्छ कापड घेऊन पुसून घ्या. मग मिक्सर मध्ये बारीक ग्राइंड करून घ्या.
पॅन मध्ये फूल क्रीम दूध गरम करायला ठेवा. आपल्याला दूध थोडेसे आटवून घ्यायचे आहे.
दुसऱ्या एका पॅनमध्ये तूप गरम करून घेऊन त्यामध्ये साबूदाणाचे पीठ घालून मंद विस्तवावर 5-7 मिनिट भाजून घ्यायचे आहे. साबूदाणाचे पीठ भाजल्यामुळे त्याचा कच्चा असा सुगंध येत नाही. मग त्यामध्ये डेसिकेटेड कोकनट घालून परत दोन मिनिट भाजून घेऊन विस्तव बंद करा.
आता दुधामध्ये हळू हळू साबूदाणा पीठ घालून मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये क्रीम घालून मिक्स करून साखर, वेलची पावडर व थोडेसे ड्राय फ्रूट घालून मिक्स करा. आता मिश्रण घट्ट होई पर्यंत गरम करून घ्या. एका स्टीलच्या प्लेटला किंवा ट्रेला तूप लाऊन घ्या.
पॅन मधील मिश्रण घट्ट व्हायला लागले व बाजूनी कडा सुटायला लागल्या की लगेच तूप लावलेल्या ट्रे मध्ये काढून घ्या. मिश्रण एक सारखे करून त्यावर ड्राय फ्रूट ने सजवून थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापून सर्व्ह करा.