Healthy Crispy Dudhi Bhopla Stuffed Paratha | Bottle Gourd Paratha For Kids Recipe In Marathi
हेल्दी खुसखुशीत निराळा दुधी भोपळा स्टफ पराठा मुलांसाठी एकदा बनवाच मिनिटात संपेल
दुधी भोपळा हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप हितावह आहे. आपण ह्या अगोदर दुधी भोपळाचे पराठे व दुधी भोपळा थालीपीठ कसे बनवायचे ते पाहिले.
आज आपण दुधी भोपळ्याचा स्टफ पराठा अगदी निराळ्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहणार आहोत. दुधी भोपळा पराठा सारण अगदी निराळ्या पद्धतीने बनवले आहे. दुधी भोपळा पराठा आपण नाश्तासाठी किंवा मुलांना डब्यात देण्यासाठी मस्त आहे. मुले अगदी आवडीने खातील त्याचा डब्बा मिनिटात संपेल.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 3 पराठे बनतात
साहित्य:
पराठा आवरणासाठी:
1 कप गव्हाचे पीठ
2 टे स्पून बेसन
1 टी स्पून कसूरी मेथी
मीठ चवीने
1 टी स्पून तेल
सारण बनवण्यासाठी:
1 कप दुधी भोपळा किसून
2 टे स्पून कांदा (बारीक चिरून)
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1/2 टी स्पून गरम मसाला
1 टी स्पून धने-जिरे पावडर
कोथिंबीर चिरून
मीठ चवीने
2 टी स्पून तीळ
1 टी स्पून तेल
तेल पराठा भाजण्यासाठी
कृती: सारणासाठी: दुषी भोपळा धुवून, सोलून, किसून घ्या, एक स्वच्छ कपडा घेऊन त्यामध्ये दुधी भोपळाचा कीस ठेऊन घट्ट बांधून त्यामध्ये पाणी एका वाटीत काढून घ्या ही पाणी पीठ मळायला वापरायचे.
आवरणसाठी: एका बाउलमध्ये गव्हाचे पीठ, बेसन, कसूरी मेथी, मीठ मिक्स करून दुधी भोपळा पिळलेले पाणी वापरुन पीठ मळून घ्या. पीठ मळल्यावर त्याला वरतून तेल लाऊन मळून झाकून बाजूला ठेवा.
आता एका प्लेटमध्ये किंवा बाउलमध्ये दुधी भोपळाचा कीस घेऊन त्यामध्ये
लाल मिरची पावडर, हळद , गरम मसाला, धने-जिरे पावडर, कांदा चिरलेला, कोथिंबीर व मीठ घालून मिक्स करून घ्या.
पराठा बनवण्यासाठी: गव्हाच्या पिठाचे एक सारखे 3 गोळे बनवून घ्या. सारणाचे सुद्धा 3 भाग करून घ्या. एक गोळा घेऊन पिठावर पुरीसारखा लाटून घ्या, मग त्यामध्ये सारणाचा एक भाग ठेवून गोळा बंद करून पीठ लावून हळुवार पणे लाटून घ्या.
तवा गरम झाला की त्यावर लाटलेला पराठा ठेवून तेल लावून दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्या. अश्या प्रकारे बाकीचे पराठे लाटून घ्या.
गरम गरम दुधी भोपळा स्टफ पराठा तूप लावून टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.