गुरुपूर्णिमा निमित्त पाकातील स्वादिष्ट रवा नारळ लाडू तोंडात टाकताच विरघळणारे मऊ
Pakatale Rawa-Naral Ladoo | Semolina-Coconut Ladu | Soft Suji-Nariyal Ladu Recipe In Marathi
रवा नारळ लाडू सर्वांना आवडतात. आपण सण किंवा दिवाळी असली की अश्या प्रकारचे लाडू बनवतो. आपण इतर वेळी सुद्धा रवा-नारळ लाडू बनवू शकतो.
रवा-नारळ लाडू बनवताना आपण एकतारी पाक बनवून घेणार आहोत. पाकातील रवा-नारळ लाडू बनवायला अगदी सोपे आहेत. तसेच ते छान खमंग लागतात. पाकातले रव्याचे लाडू बनवताना बरेचजणी म्हणतात की पाक बरोबर होत नाही लाडू टणक होतात किंवा अगदी सैल होतात. आपण जर पाक बोटावर घेऊन चेक केला व एक तार आली असे दिसले तर पाक तयार झाला असे समजावे.
The Rawa-Naral Ladoo | Semolina-Coconut Ladu | Soft Suji-Nariyal Ladu Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel Rawa-Naral Ladoo | Semolina-Coconut Ladu | Soft Suji-Nariyal Ladu
रवा भाजताना नेहमी मंद विस्तवावर भाजावा म्हणजे छान गुलाबी रंग येतो व एकसारखा भाजला जातो.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 15 लाडू बनतात
साहित्य:
2 वाट्या बारीक रवा
1 वाटी ओला नारळ
1 वाटी तूप किंवा डालडा
1 1/2 वाटी साखर
3/4 वाटी पाणी
1 टी स्पून वेलची पावडर
1/4 टी स्पून जायफळ पूड
थोडे काजू-बदाम-किसमिस
कृती: प्रथम नारळ खोवून बाजूला ठेवा. वेलची पावडर करून घ्या, जायफळ किसून बाजूला ठेवा.
एका कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये ड्रायफ्रूट परतून घेऊन बाजूला काढून ठेवा. मग त्याच कढईमध्ये रवा घालून छान गुलाबी रंगावर मंद विस्तवावर भाजून घ्या, मग त्यामध्ये खोवलेला नारळ घालून 3-4 मिनिट भाजून घ्या. रवा व नारळ भाजल्याचा छान खमंग सुगंध आला की विस्तव बंद करून रवा एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवा.
मग कढईमध्ये साखर व पाणी मिक्स करून मंद विस्तवावर एक तारी पाक करून घ्या, पाक झाला की नाही ते कसे पहायचे तर बोटावर थोडासा पाक घेवून दोन बोटांमद्धे घेऊन पहायचे की तार येते का. एक तार आलेली दिसली की त्यामध्ये रवा, वेलची पावडर व जायफळ घालून मिक्स करून घ्या. आता विस्तव बंद करून कढईवर झाकण ठेवून बाजूला ठेवा. मग मधून मधून एक-दोन वेळ झाकण काढून हलवून परत झाकण ठेवा.
आता मिश्रण थोडे कोमट झाले की त्यामध्ये ड्रायफ्रूट घालून मिक्स करून छान लाडू वळून घ्या मग डब्यात भरून ठेवा.