टिप्स: दिवाळी फराळ चिवडा बनवताना ह्या ट्रिक्स वापरा मस्त टेस्टि कुरकुरीत चिवडा बनतो
Smart Tips For Making Diwali Faral Crispy Chivda In Marathi
दिवाळी जवळ आली की सगळ्या महिलांना फराळ करायचा खूप उत्साह असतो. मग आपण शोधत रहातो की जरा वेगळा फराळ कसा बनवायचा. लाडू, करंजी, अनारसे, चिवडा असे बरेच प्रकार आहेत पण प्रत्येकाची पद्धत व चव वेगळी आहे. आपल्याला दिवाळीचा आनंद लुटायचा असेलतर चांगले-चांगले पदार्थ बनवून दिवाळीचा आनंद लुटायचा आहे.
चलातर मग बघूया काही खमंग कुरकुरीत टेस्टि चिवडा बनवण्याच्या टिप्स व ट्रिक्स
चिवडा बनवतांना काही टिप्स आहेत:
* चिवडा बनवतांना प्रथम पोहे निवडून, चाळून एक दिवस आगोदर कडकडीत उन्हात ठेवा म्हणजे चिवडा बनवताना परत पोहे भाजून घ्यावे लागत नाहीत किंवा उन नसेलतर चिवडा बनवण्या अगोदर पोहे मंद विस्तवावर भाजून घ्या म्हणजे चिवडा छान कुरकुरीत होईल.
* पोह्याचा चिवडा बनवायचा असलेतर त्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचे पोहे आहेत पातळ पोहे, नायलॉन पोहे किंवा भाजके पोहे तळावे लागत नाहीत पण दगडी पोहे, मक्याचे पोहे व जाड पोहे तळून घ्यावे लागतात.
* चिवडा बनवतांना तेल चांगले वापरावे तसेच चिवडा बनवतांना थोडे थोडे वनस्पती तूप वापरले तर त्याची टेस्ट अजून छान लागते.
* चिवडा बनवतांना खोबऱ्याचे काप, पंढरपुरी डाळ, शेगदाणे,काजू, बेदाणे, हिरवी मिरची चिवडा मसाला, कडीपत्ता सर्व तयार ठेवा म्हणजे चिवडा बनवतांना गडबड होत नाही व आपल्याला पटकन बनवता येतो.
* खोबरे काप बनवतांना छान एकसारखे पाहिजे असेल तर पाण्यात अर्धा ते एक तास भिजत ठेवून मग पाणी काढून त्याचे काप करावे लवकर होतात.
* आंबट गोड चिवडा बनवतांना आपण आमसूल किंवा सायट्रिक अँसिड वापरतो. तर आमसूल आगोदर तळून घ्या व थंड झाल्यावर चिरून घ्या. सायट्रिक अँसिड वापरायचे असेल तर पिठीसाखर व सायट्रिक अँसिड एकदम मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
* दगडी पोहे, मक्याचे पोहे व जाड पोहे चिवडा बनवणार असालतर प्रथम तेल चांगले तापून घ्या. व पोहे तळताना विस्तव मोठा ठेवा मग तळून झाल्यावर टिशू पेपरवर ठेवा म्हणजे जास्तीचे तेल निघून जाईन.
* पिठीसाखर वापरतांना सर्वात शेवटी पिठीसाखर वापरायची म्हणजे चिवडा छान कुरकुरीत होतो.
* खमंग चिवडा बनवतांना आपण कांदा चिरून उन्हात वाळवून मग तळून घेतो. काही वेळेस उन्हात वाळवून घेणे शक्य नसते तेव्हा कांदा उभा पातळ चिरून पेपरवर वाळत घालून वाळला की मग तळावा. कांदा वाळायला साधारपणे २-३ तास लागतात किंवा सोपा उपाय म्हणजे आपण कांदा किसून त्यातील रस थोडेसे दाबून काढा पूर्ण रस काढायचा नाही थोडासा काढायचा मग तेलाच्या फोडणीत घालून गुलाबी रंगावर परतून घ्यायचा.
* चिवडा बनवून झाल्यावर पूर्ण थंड झाल्यावर मग २ प्लास्टिकच्या पिशव्यात भरून घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा व पाहिजे तेव्हडा काढून घ्या. म्हणजे तो जास्त दिवस ताजा राहील. आता प्लास्टिकच्या पिशव्या नसतील तर आपली कॉर्न फ्लेक्सच्या पिशव्या जपून ठेवा मग त्या वापरा.
* दिवाळी फराळातील चिवडा जास्त उरला तर प्लास्टिक पिशवीत घट्ट बंद करून ठेवा व आपण आठवड्यातून एक दोन वेळा पोहे किंवा उपीट बनवतो तेव्हा हा चिवडा सजावटीसाठी वापरा पोहे व उपीट चवीला टेस्टी लागते.