टिप्स अँड ट्रिक्स दिवाळी फराळ करीता करंज्या हमखास चांगल्याप्रकारे कश्या बनवाव्या:
Tips And Tricks For Making Delicious Karanji Diwali Faral In Marathi
दिवाळी फराळामध्ये करंज्याला महत्वाचे स्थान आहे. करंज्या वेगवेगळ्या प्रकारे बनवता येतात. करंजी ही फार पूर्वीच्या काळा पासून बनवतात. उत्तर भारतात करंजीला गुजीया असे म्हणतात तर गोवा कोकण ह्या भागात नेवरी असे म्हणतात. तर पठारे प्रभूच्या घरात खाज्याचे कानवले असे म्हणतात. तर सारस्वताकडे साट्याच्या करंज्या असे म्हणतात.
करंज्या दोन प्रकारच्या करतात. ताज्या किंवा टिकाऊ! ताज्या करंज्यातील सारण ओलसर व वरची पारी मऊ असते. ह्या करंज्या लगेच संपवाव्या लागतात. त्यामुळे जेवणात पक्वान्न म्हणून केल्या जातात. दिवाळीसाठी १०-१२ दिवस टिकतील अश्या बनवतात. यातही खूप प्रकार आहेत.
करंज्या बनवणे म्हणजे थोडे कष्टाचे काम आहे. दोघींनी मिळून बनवल्या तर म्हणजे एक जणींनी लाटून भरून तयार ठेवल्या व दुसरीने तळून घेतल्या तर लवकर होतात. बरेच वेळा पारी मऊ पडते किंवा करंजी फुटून तेल किंवा तूप खराब होते. त्यासाठी काही महत्वाच्या टिप्स देत आहे.
करंजी बनवतांना काही टिप्स:
करंजीच्या पारीसाठी रवा, रवा आणि मैदा, किंवा फक्त मैदा वापरतात. यापैकी काहीही वापरले तरी पीठ घट्ट मळावे. पीठ मळताना पाणी वापरण्याच्या आयवजी दुधाने किंवा नारळाच्या दुधाने मळावे.
पारी साठी रवा वापरला तर आधी २-३ तास पीठ भिजवून आयत्यावेळी कुटून घ्यावे. आणि गोळे बनवून भांड्यात झाकून ठेवाव्या. तसेच तयार झालेल्या करंज्या ओल्या घट्ट पिळलेल्या कापडात झाकून ठेवाव्या म्हणजे तळताना सुकून फुटणार नाहीत. नाहीतर ह्वेनी कारंजी सुकून मग फुटते.
पारी लाटताना पातळ लाटावी म्हणजे तळताना करंजीवर बारीक फोड येतात. आणि त्या खुशखुशीत आणि कडक राहतात. पीठ जर सैल झालेतर तर पारी पातळ लाटता येत नाही. त्यामुळे करंजीवर पुरी सारखा पापुद्र धरतो व करंजी मऊ होते.
पीठ मळताना मोहन जर कमी पडले तर करंजी चिवट होतात. तर जास्त झालेतर मोडतात.
करंजीमध्ये सारण भरतांना कोरडे व भरपूर भरलेले हवे. सारण भरल्यावर कडेला दुधाचा हात लावून करंजी चीटकवावी व गोलाकार कापावी. म्हणजे तळताना उघडत नाही.
करंजी तळताना एखादी करंजी फुटली तर लगेच तूप गाळून घ्या. नाहीतर सारणाचे जळलेले कण बाकीच्या करंज्या तळताना त्यांना चिकटतात. मग करंजीचा रंग व चव बदलते.
करंजी तळताना मंद विस्तवावर तळलीतर छान खुशखुशीत होते व रंगही छान येतो. करंजी तळताना फार लाल किंवा पांढरी तळू नये. बदामी किवा मोतीया रंगावर तळावी. थंड झाल्यावर स्टीलच्या डब्यात भरून ठेवावी.